शेरास सव्वाशेर! राजस्थान रॉयल्सकडून पंजाबचा पराभव

राजस्थानने स्टीव्ह स्मिथच्या 50, संजू सॅमसनच्या 85 व राहुल तेवतियाच्या 53 धावांच्या जोरावर गाठले.

सचिन दळवी | प्रतिनिधी

शारजाह : राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 4 गडी राखून पराभव केल्यामुळे मयंक अग्रवालच्या 50 चेंडूत 106 धावा व्यर्थ गेल्या. पंजाबने विजयासाठी ठेवलेले 224 धावांचे लक्ष्य राजस्थानने स्टीव्ह स्मिथच्या 50, संजू सॅमसनच्या 85 व राहुल तेवतियाच्या 53 धावांच्या जोरावर गाठले.

224 या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली व त्यांनी तिसऱ्याच षटकात 26 धावांत जोस बटलरच्या रुपात पहिला गडी गमावला. आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून संघात परतलेला जोस बटलर 4 धावा करून बाद झाला.

बटलर बाद झाल्यानंतर स्मिथ व संजमू सॅमसन यांनी शानदार खेळी केली व राजस्थानला विजयाच्या मार्गावर अग्रेसर केले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 81 धावांनी भागीदारी केली. स्मिथ 50 तर संजू 85 धावा करून बाद झाला.

अखेर राहुल तेवतिया (53) व जोफ्रा आर्चर (13) यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या समिप आणले. विजयासाठी 2 धावांची गरज असताना तेवतिया बाद झाला मात्र उर्वरित धावा टॉम करनने (4) चौकार लगावत काढताना विजय मिळवला.

अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्या जोडीने शानदार डाव खेळत राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य दिले. यावेळी या मैदानावर एका फलंदाजाने आपल्या फलंदाजीने वर्चस्व निर्माण केले तो होता मयंक अग्रवाल. मयंक अग्रवालनेच 45 बॉलमध्ये शतक पूर्ण करून विक्रम केला. सलामीसाठी आलेल्या राहुल-मयंक जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पाच षटकांत 58 धावा केल्या.

सर्वांत महागडा पॉवर-प्ले
राहुल-मयंक जोडीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आयपीएल 2020 च्या मोसमातील आतापर्यंतचा सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या उभारली आहे. शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या 6 षटकांत 60 धावांवर नेली. केएल राहुलने राजस्थानचा सर्वात अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चरला एकाच षटकात 3 चौकार ठोकले.

राजस्थानकडून अखेरच्या सामन्याचा नायक असलेला राहुल तेवतिया, उनाडकट, आर्चर आणि टॉम करनसुद्धा काही चमक दाखवण्यात अपयशी ठरले आणि दोन्ही फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून संघाची धावसंख्या 10 षटकांत 110 धावांवर पोहोचवली. मयंक अग्रवालने येथे आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

पंजाबची सलामीची जोडी प्रत्येक धावसंख्येसह विक्रम करत होती आणि संघाने येथील सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही केला. संघाने एकही गडी न गमावता 11.2 षटकांत 127 धावा केल्या. यानंतर केएल राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही दोघांनीही आपले आक्रमण सुरू ठेवले आणि राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध धावा करणे सुरू ठेवले. संघाने येथे 13.2 षटकांत 150 चा आकडा पार केला. यासह, मयंक अग्रवालने इतिहास रचला आणि आयपीएलमध्ये 45 चेंडूंमध्ये पहिले शतक ठोकले. यासह, मयंक अग्रवाल आता आयपीएलमधील वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर युसुफ पठाण आहे ज्याने 37 चेंडूत शतक ठोकले.

पंजाबने येथे 16 षटकांत एकही गडी न गमावता 178 धावा केल्या. आतापर्यंत राजस्थानचा एकही गोलंदाज दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणू शकला नाही. त्यानंतर टॉम करनने संघाला पहिले यश मिळवून दिले, तिथे मयांक अग्रवाल मोठा शॉट खेळल्यानंतर 106 धावांवर बाद झाला. आता राहुलला साथ देण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल क्रीजवर आला आणि त्याने येताच चौकार लगावला. त्यावेळी के.एल. राहुल देखील संघाच्या 194 धावांवर वैयक्तिक 69 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

आता निकोलस पूरन क्रीजवर आला आणि त्यानेही मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली. संघाने 19 षटकांत 205 धावा केल्या. शेवटी पंजाबने 2 गडी गमावून 223 धावा केल्या आणि राजस्थानला 224 धावांचे लक्ष्य दिले. शारजाह मैदानावरील कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!