क्रीडा वार्ता | BGT IND vs AUS, 4TH TEST, AHEMADABAD : शुभमन गिलच्या शतकाने सामना आला रंगात , तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
IND vs AUS: चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यन्त टीम इंडियाने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर या सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 480 धावा केल्या होत्या. पण टीम इंडियानेही तीन गडी गमावून २८९ धावा केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिलने टीम इंडियाला पुनः मॅचमध्ये घेऊन आले आहे . संघाचा सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने 235 चेंडूंचा सामना करताना 128 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकारही लगावला.
शुभमन आणि पुजाराच्या भागीदारीने भारताच्या आशा उंचावल्या
या सामन्यात भारताने कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पहिली विकेट ७४ धावांवर गमावली. यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सांभाळला, दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान पुजाराने 42 धावा केल्या. 187 धावांवर पुजाराची विकेट पडली. पुजारा गेल्यानंतर विराट कोहली मैदानात आला.
विराट आणि गिल यांच्यात चांगली भागीदारीही झाली. या भागीदारीदरम्यान गिलने आपले शतक झळकावले. शुभमन गिलचे हे भारतातील पहिले कसोटी शतक आहे. 245 धावांवर शुभमन गिलची विकेट गेली. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा दिवसअखेरपर्यंत क्रीजवर होते.
चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने हा विक्रम केला आहे
अहमदाबाद कसोटीत चेतेश्वर पुजाराने 42 धावांची खेळी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने या सामन्यात 10वी धाव करताच त्याच्या 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 हून अधिक धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनने भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 39 सामन्यात 3630 धावा केल्या आहेत. याशिवाय विराट कोहलीनेही या सामन्यात एक विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 42 धावा करताच भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या.

टीम इंडियाला चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या करायची आहे
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी शानदार पुनरागमन केले आहे. मात्र हा कसोटी सामना आपल्या नावावर करण्यासाठी त्याला चौथ्या दिवशी अतिशय वेगवान फलंदाजी करावी लागणार आहे. जर टीम इंडियाने असे केले नाही तर हा सामना ड्रॉ होऊ शकतो, ज्यामुळे टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते. WTC च्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. जर टीम इंडियाने हे केले नाही तर त्यांना श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या निकालाची वाट पाहावी लागेल.