हुश्श…! नव्या पॉलिसीबाबत WhatsAppचा मोठा दिलासा

पॉलिसी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलली

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या आठवड्याभरापासून विषय गाजतोय, तो WhatsAppचा. WhatsAppच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे सगळेच जण आता दुसरं कोणतं ऍप वापरायचं हे ऐकमेकांना विचारु लागलेत. अशातच WhatsAppने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता WhatsAppची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक युजर्सना मोठा दिलासा मिळालाय. WhatsAppनं आधी ८ फेब्रुवारीपर्यंत नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत दिली होती. जे कुणी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचं अकाऊंट डिलीट होणार होतं. दैनंदिन गरजांमध्ये आता अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच WhatsAppचंही नाव घेतलं जातं. अशात WhatsAppच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत घेण्यात आलेला नवा निर्णय अनेकांसाठी दिलासादायक मानला जातो आहे.

तारीख पुढे ढकलली

WhatsAppने प्रायव्हसी नियमांसाठीच्या अटी स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलली असून 8 फेब्रुवारीवरून वाढवून आता ही तारीख 16 मे 2021 करण्यात आलीय. म्हणजेच आता १६ मे पर्यंत लोकांना वेळ मिळणार आहे. या कालावधी काही महत्त्वपूर्ण बदलही WhatsAppकडून केले जाण्याची शक्यता आहे. प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्याच्या वृत्तानंतर WhatsAppवर सडकून टीका झाली होती. WhatsAppचे डाऊनलोड्स घटले होते. तर टेलिग्राम आणि सिग्नलचे डाऊनलोड्स लक्षणीय प्रमाणात वाढले होते.

हेही वाचा – WhatsApp सोडून सिग्नल वापरणाऱ्यांची संख्या वाढतेय! तुम्ही काय करावं?

काय आहे WhatsAppची नवी प्रायव्हसी पॉलिसी?

नवीन अपडेटमध्ये असं म्हटलंय की, ‘व्हॉट्सअ‍ॅप आपले नियम आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) अपडेट करतंय. मुख्य अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा, डेटावर प्रक्रिया कशी करावी, इतर फेसबुक सेवांच्या व्हॉट्सऍप चॅट्सचं स्टोअरेज आणि मॅनेजमेन्ट कसं करावं आणि व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकसह फेसबुक कंपनीच्या उत्पादनांमध्ये कसं इंटिग्रेट होईल याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. ‘

नवीन पॉलिसीचा अर्थ असा आहे की आपल्याकडे व्हॉट्सऍपवर कोणताही डेटा आहे, तो आता इतर फेसबुक कंपन्यांसह देखील शेअर केला जाईल. या डेटामध्ये तुमचं लोकेशन, आयपी पत्ता, टाइम झोन, फोन मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टम, बॅटरी पातळी, सिग्नल सामर्थ्य, ब्राउझर, मोबाइल नेटवर्क, आयएसपी, भाषा, वेळ क्षेत्र आणि आयएमईआय क्रमांक समाविष्ट आहे. फक्त हेच नाही, आपण संदेश किंवा कॉल कसा कराल, कोणते गट कनेक्ट केलेले आहेत, आपली स्थिती, प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीनही शेअर केलं जाईल. याचाच अर्थ व्हॉट्सअप वापरणाऱ्यांवर पूर्णपणे सर्विलन्स ठेवता येऊ शकेल, असाही दावा केला जातोय.

हेही वाचा – खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग?

डेटा सुरक्षेच्या दृष्टीनं इंटरनेट एक्स्पर्ट प्रसाद शिरगांवकर यांनी दिलेली माहितीची इंटरेस्टिंग आहे. व्हॉट्सअप वापरं की वापरु नये, याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून लोकांना मार्गदर्शन केलंय. ते असं म्हणतात की…

“व्हॉट्सऍप आता आपला डेटा प्रचंड मोठ्या प्रमाणात चोरून फेसबुकला देणार आहे. म्हणून ते आता डिलीट करून सिग्नल किंवा टेलिग्राम वापरायला लागलं पाहिजे’ अशा आशयाची एक प्रचंड मोठी चळवळ गेले दोनचार दिवस व्हॉट्सऍप आणि फेसबुकवरच सुरु झालेली दिसत आहे! हे म्हणजे गनिमाच्या छावणीत आपण कैदी म्हणून बंदिस्त असताना तिथला एखादा नियम बदलला म्हणून तिथेच लुटुपुटूचं आंदोलन वगैरे करण्यासारखं आहे! पण ते असो.
तर व्हॉट्सऍप असं म्हणत आहे की ८ फेब्रुवारी नंतर ते आपला (सध्या करत आहेत त्याहून खूप जास्ट) डेटा फेसबुकसोबत शेअर करणार आहेत. हे तुम्हाला मान्य असेल तरच तुम्हाला व्हॉट्सऍप वापरता येईल, नसेल तर वापरता येणार नाही, ‘गेलात उडत!’
बहुसंख्य लोकांना सगळ्यांत जास्त दुःख किंवा वेदना ह्या काहीही पर्याय नसलेल्या ‘गेलात उडत’ची आहे. माझा डेटा तुमच्या पेरंट कंपनी किंवा इतर भागिदारांशी शेअर करायचा तर माझी परवानगी घ्या, ती असेल तर करा, नसेल तर करू नका इतका साधा शिष्टाचार व्हॉट्सऍप पाळत नाहीये ही मुख्य त्रासदायक गोष्ट आहे.
गंमत म्हणजे युरोपियन युनियनमध्ये, जिथे ग्राहकांच्या खाजगी माहितीच्या शेअर करण्याविषयीचे कायदे अत्यंत कडक आहेत, तिथे व्हॉट्सऍप हा चावटपणा करणार नाहीये. तिथे गुमानपणे ग्राहकांची परवानगी असेल तरच त्यांचा व्यक्तिगत डेटा शेअर करू शकणार आहे. भारतासारख्या ज्या देशांमध्ये असे कायदे नाहीत तिथे ग्राहकांच्या डेटाची बिनधास्त चोरी आणि शेअरिंग होणार आहे. भारतात साधारण तीन वर्षांपूर्वी Personal Data Protection Bill आणलं आहे सरकारने, मात्र त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करायला सरकारला वेळ नाही आणि आपणा कोणाला रस नाही. आणि जोवर आपल्या खाजगी डेटाचं संरक्षण करणारा कायदा आपल्या देशात होत नाही तोवर फेसबुक-व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडिया कंपन्या आपल्या डेटाची काय वाट्टेल ती चोरी करण्याबाबत त्यांची मनमानी करू शकणार आहेत.
आपली व्यक्तिगत माहिती गोळा करून त्याचा कोणी गैरवापर करू नये असं वाटत असेल तर सध्या आपल्यापुढे खरंतर दोनच पर्याय आहेत. १. आपली कमितकमी व्यक्तिगत माहिती ऑनलाईन टाकणे. किंवा २. कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाचा अजिबात वापर न करणे.
जोवर आपल्या देशात Personal Data Protection Act होत नाही अन त्याची कडक अंमलबजावणी होत नाही तोवर सोशल मीडियाचा अत्यंत मर्यादित वापर करणे किंवा अजिबात वापर न करणे एवढे दोनच पर्याय आपल्यापुढे आहेत.
‘काय होईल ते होईल, बघू पुढे’ म्हणून ह्या सोशल मीडियाच्या झंझावातात स्वतःला मुक्त सोडून देणं. किंवा, ‘नको रे बाबा, मी आपला सेफ रहातो’ म्हणून सर्व सोशल मीडियापासून लांब रहाणं हे दोनच पर्याय आपल्यापुढे आहेत.
आय मीन, जोवर युरोपियन युनियन सारखं आपलं सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं रहात नाही, तोवर हे एवढे दोनच पर्याय आहेत!
पण आपल्या पाठीशी कोणीच उभं रहात नाही हे आपल्याला माहित आहे.
म्हणून व्हॉट्सऍप (अन इतर सर्व सोशल मीडिया) वापरत रहायचा का डिलीट करायचा हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे!

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!