टिकटॉकने हटवले भारतीयांचे 3.7 कोटी व्हिडीओ!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
बीजिंग : चिनी अॅप ‘टिकटॉक’ने (tik tok) कम्युनिटी गाईडलाईन्सचे नियम मोडणाऱ्या व्हिडीओंना मागच्या सहा महिन्यांपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत सुमारे 1.4 कोटी व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. यात 3.7 कोटी भारतीय व्हिडीओंचा समावेश होता. 98 लाख व्हिडीओ डिलीट झाल्याने भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घातली आहे. आता ओरॅकल-वॉलमार्ट ‘टिकटॉक’ विकत घेणार असल्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.
बंदी येण्यापूर्वी भारतात टिकटॉकचे 20 कोटी वापरकर्ते होते. भारत आणि अमेरिका यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानचे 64 लाख, ब्राझीलचे 55 लाख, तर ब्रिटनचे 29 लाख व्हिडीओ टिकटॉकने डिलीट केले आहेत.
जेडीनेटच्या अहवालानुसार, वापरकर्त्यांनी रिपोर्ट करण्यापूर्वीच एकूण व्हिडीओंपैकी 96.3% व्हिडीओ डिलीट करण्यात आले होते. तर यातील 90.3% व्हिडीओंना वापरकर्त्यांनी नंतर रिपोर्ट केले. न्यूडीटी आणि लैंगिकतेला प्रोत्साहन दिल्या कारणाने 22.3%, तर सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 19.6% व्हिडीओ हटवले गेले आहेत. हे व्हिडीओ हटवण्यासाठी सरकार, कायदा अंमलबजावणी संस्था तसेच आयपी हक्क धारकांकडून कायदेशीर विनंती करण्यात आली असल्याचे टिकटॉककडून सांगण्यात आले आहे.
जून महिन्यात चीन-भारत सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉक, व्हीचॅट, यूसी ब्राऊझरसहित 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली ही 59 अॅप्स वापरण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.
देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 अ च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशवासियांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते.