UPI ट्रान्झॅक्शनच्या नियमात बदल होण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते. सोबतच यामध्ये peer to peer रक्कम जमा करण्याची पद्धत ज्यामध्ये सोयीनुसार नियोजित दिवशी आणि गरजेप्रमाणे रक्कम पाठवली जाते. UPI मधून पैसे पाठवताना लॉगिनची गरज नाही, खातेक्रमांकांची गरज नाही, IFSC ची गरज नाही. केवळ एका छोट्या यूजरनेम ज्याला UPIमध्ये VPA (व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस) म्हटलं जातं या VPA सहाय्याने कोणालाही अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवता येतात.
भारतात सध्या UPI ट्रान्झॅक्शन सवयीचा भाग बनला आहे. कोणत्याही बँकेचे अकाऊंट असेल तरी कोणत्याही अॅपच्या माध्यमातून UPI ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ऑनलाईन पेमेंट प्रकारावर लोकांचा जास्त भर असल्याचं दिसू लागलंय. त्यातही UPI पेमेंटला लोकांची अधिक पसंतीये. पण, UPIद्वारे पैसे पाठवणाऱ्यांसाठी सध्या एक चिंतेची बाब म्हणजे १ जानेवारीपासून UPI ट्रान्झॅक्शनच्या नियमात एक बदल होण्याची शक्यताये.
नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती समोर येते. हा नियम केवळ थर्ड पार्टी अॅपसाठी लागू असणारे. स्वत:ची पेमेंट बँक नसलेले अॅप म्हणजेच फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन पे यांसारख्या थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून जर UPI ट्रान्झॅक्शन करण्यात आले तर त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचा विचार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करत आहे. याचसोबत, NPCI ने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचाही निर्णय घेतलाय.
या निर्णयाबाबत NPCIने सांगितले की, सध्या UPI वरून पैसे पाठवणाऱ्यांची संख्या महिन्याला सुमारे २०० कोटी इतकी आहे. थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि निकोप स्पर्धेसाठी NPCIने हा निर्णय घेतलाय.
गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे यांसारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होणारे. मात्र या नियमाचा परिणाम ‘पेटीएम’च्या ग्राहकांवर होणार नाही. UPI ट्रान्झॅक्शनसाठीचे लावले जाणारे शुल्क हे ‘पेटीएम’ला लागणार नाही. कारण पेटीएम पेमेंट बँक स्वरूपात अस्तित्वात आहे.