आज पहिला श्रावणी सोमवार! अशी करा पूजा…

Goan Varta Live | प्रतिनिधी
श्रावण हा व्रत-वैकल्यांचा, सणावारांचा पवित्र महिना. श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस हा सोमवार आहे. श्रावणी सोमवार हा अतिशय दिवस महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. श्रावण महिना आणि श्रावणी सोमवार हे शंकराच्या पूजेसाठी विशेष आहेत. त्यामुळे, या दिवशी शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. श्रावणी सोमवारचं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होतात. सगळे त्रास दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे.

हेही वाचा – गोवा राज्यात 16 ऑगष्टपर्यंत कर्फ्यू वाढला
श्रावणी सोमवारची पूजा कधी करतात?
– सकाळी लवकर उठावं आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे
– प्रार्थनास्थळ स्वच्छ करावं
– उपवासाला सुरुवात करावी.
– सकाळी आणि संध्याकाळी शंकराची पूजा करावी
– तिळाच्या तेलाचा दिवा लावून शंकराला बेल आणि फुलं अर्पण करावीत
– भगवान शंकराच्या मंत्रांचा जप आणि शनि चालिसेचं पठण करावं
– शिवलिंगाला जलाभिषेक करा आणि सुपारी, पंच अमृत, नारळ आणि बेल पानं अर्पण करावीत
– श्रावण व्रताची कथा वाचावी
– शंकराची आरती करून प्रसाद घ्यावा
– पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा.
व्रताचे फायदे
श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते, असं मानलं जातं. शनिदेव हे भगवान शिवाचे आवडते शिष्य असल्याने श्रावणी सोमवारच्या या व्रताने भगवान शंकरासह शनिदेवही प्रसन्न होतात, असंही म्हणतात. त्याचसोबत, चंद्र दोष, ग्रहण दोष किंवा सर्प दोष असला तर यांतून मुक्त होण्यासाठी अनेकजण श्रावणी सोमवारचं व्रत करतात.
महत्त्व काय?
पौराणिक कथेनुसार, पार्वतीने या महिन्यात उपास करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर उपवास ठेवले होते. असं मानलं जातं की, या कारणामुळे हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच, या महिन्यात भक्त शंकराच्या पिंडीवर पाणी अर्पण करतात. त्याचप्रमाणे, श्रावणाच्या या महिन्यात रुद्राभिषेक करणं देखील खूप फलदायी असल्याचं बोललं जातं.