पावसाळ्यात आहारात करा ‘या’ खास गोष्टींचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतोच. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. मात्र हे आजार होण्यापूर्वीच जर आपण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर हे साथीचे आजार टाळता येऊ शकतात. चला तर आज पाहुयात पावसाळ्यात आपल्या आहारात कोणत्या गोष्टी असायला हव्यात.

आलं

आलं हे चवीला जरी तिखट असले तरी ते आपल्या आरोग्यास अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलकं असतं. सर्दी खोकला साठी सुद्धा आलं उपयुक्त आहे. तापानंतर खूप थकवा आला असल्यास, तोंडाला चव नसल्यास, मळमळत असल्यास किंवा शरीर दुर्बलता यामुळे चिडचिड होत असेल तर आले किसून त्यावर लिंबू पिळावे आणि खडीसाखर मिसळावी. असे हे आल्याचे पाचक रोज थोडं थोडं खावं. ज्याचा आपल्या शरीराला अप्रतिम लाभ होतो.

गवती चहा

गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. सर्दी-पडसं असेल तर गवती चहा प्यावा. ताप आला असेल तर गवती चहाची भरपूर पानं घालून चहा प्यावा. याने खूप घाम येऊन ताप उतरतो. सर्दी झाली असेल तर गवती चहात पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा तयार करा. हा काढा रोज रात्री एक कप प्यावा आणि उबदार पांघरून घेऊन झोपावं. यामुळे जुनाट सर्दी-पडसं कमी होतं.

लसूण

एका लसणाच्या 4 कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडं गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा. डोकं दुखणं थांबेल. बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचं नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.

तुळस

तुळशीचा चहा हा सर्दी-खोकला यावर प्राथमिक उपाय आहे. तुळशीची ताजी पानं धुवून घेऊन ती बारीक करावीत आणि एक कप पाण्यात घालावीत. त्यात सुंठ, वेलची पूड हे पदार्थ घालावेत. हे मिश्रण उकळून घ्यावं. शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम तुळशीचा चहा करतो. तसंच २ चमचे तुळसीचा रस, एक चमचा मध दिवसातून ३ ते ४ वेळा घ्यावा. अशा तापाबरोबर असणारा सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणंही तुळशीमुळे कमी होतात. पावसाळ्यात तुळस आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असते.

हळद

रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण सामर्थ्य हळदीत आहे. हळद रक्त शुद्ध करते आणि रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा नियंत्रित ठेवतं. खोकल्या झाल्यास एक कप कोमट दुधामध्ये एक चमचा हळद आणि चिमुटभर सुंठ पावडर टाकून ते प्यावं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!