‘कुपांचों दर्यो’च्या पोस्टरचे अनावरण

अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा कोंकणी काव्यपट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ‘सहित स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या ‘कुपांचो दर्यो’ या कोंकणी काव्यपटाच्या पोस्टरचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. यावेळी या काव्यपटाचे संवाद लेखक आणि निर्माते किशोर अर्जुन, दिग्दर्शक हिमांशू सिंह, छायाचित्रकार अश्विन चिढे, संकलक गोपाल, प्रमुख कलाकार रावी किशोर, उगम जांबावलीकर यांची उपस्थिती होती.

संपूर्ण टीमचे अभिनंदन

प्रेमाच्या एका टप्प्यावर समंजसपणातून एक दुसर्‍यासोबत साधलेला संतत संवाद आणि त्यातून एकमेकांमध्ये रुजत गेलेल्या तरल नात्याचे तितक्याच तलमतेने ‘कुपांचों दर्यो’मध्ये चित्रित करण्यात आले आहे. अभिनेत्री रावी किशोर आणि उगम जांबावलीकर यांनी यात आपल्या संयत अभिनयाने अर्थ भरला आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी या पोस्टर अनावरणप्रसंगी या काव्यपटाचा निवडक भाग पाहून कलाकारांचे विशेष कौतुक केले आणि कोंकणीमध्ये अशापद्धतीने वेगळाली वाट चोखंदळणारी निर्मिती केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या कवितेमुळे ‘कुपांचों दर्यो’ला विशेष अर्थगर्भता प्राप्त

दिग्दर्शक हिमांशू सिंह यांनी या काव्यपटाची कथा लिहिली असून, संवाद किशोर अर्जुन यांचे आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या कवितेमुळे ‘कुपांचों दर्यो’ला विशेष अर्थगर्भता प्राप्त झाली आहे. किशोर अर्जुन यांच्या ‘सहित स्टुडिओ’ आणि पी. धनलक्ष्मी यांच्या ‘थलैवर प्रॉडक्शन’ने या कोंकणी काव्यपटाची निर्मिती केली आहे. विविध सिनेमहोत्सवाच्या माध्यमातून लवकरच ‘कुपांचों दर्यो’ देशविदेशातील प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!