वजनदार भूमी ते ग्लॅमरस पेडणेकर! गोव्याच्या भूमीतली भूमी पेडणेकर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पेडणे : भूमी पेडणेकर…. गोव्यातल्या भूमीत अनेक कलाकार घडले. यापैकीच एक आहे आपल्या पेडणेची कन्या…. सुपरस्टार भूमी पेडणेकर…
मुंबई जन्माला आलेली भूमी मूळची पेडण्याची. आपल्या पेडण्याची भूमी बॉलिवूडमध्ये सध्या कमाल करतेय. तिचा हा प्रवास जबरदस्त तर आहेच.. पण गोयकरांची छाती अभिमानानं फुलवणाराही आहे. आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर छाप पाडणारी भूमी आपल्या गोव्याची आहे. ती गोव्यात येते. आपल्या पेडण्यातील ग्रामदेवतेला नमस्कारही करते.. आपल्या मूळ गावाशी असणारी भूमीची नाळ अजूनही जशीच्या तशी आहे.
जाडजूड भूमिकेतून वजनदार एन्ट्री करत भूमी पेडणेकरने संध्याची भूमिका पार पाडली. दम लगा के हायश्या सिनेमातून भूमीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पहिल्या सिनेमात तगडा अभिनय भूमीनं साकारला आणि सगळ्यांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
आयुषमान खुरानासोबत भूमी पेडणेकरने केलेली संध्याची भूमिका, अजरामर झाली. जाडजूड असणाऱ्या भूमीने आपल्या पहिल्या सिनेमानंतर मागे वळून पाहिलंच नाही. प्रचंड मेहनतीच्या बळावर तिनं आपलं काम अखंडपणे सुरुच ठेवलंय.
यश राज फिल्ममधील दम लगा कै हायश्या या सिनेमाचं कथानकही अशा मुलींवर आधारीत होतं, ज्या तब्बेतीनं आहेत. अशा जाडजूड मुलींच्या समस्या, त्यांच्याकडे कशा पद्धतीनं पाहिलं जातं, या सगळ्यांवर हलक्या फुलक्या भाषेत एक सुंदर संदेश या सिनेमातून देण्यात आला. त्यात भूमीने वठवलेली भूमिका खूपच महत्त्वाची. आपल्या अभिनयातून भूमीने या रोलचं सोनं केलं. हा भूमीचा पहिलाच सिनेमा आहे, असं कुणाला सांगितलं, तर अनेकांना आजही नवल वाटतं.
हेही वाचा – प्रभासच्या ‘राधे श्याम’ने रचला नवा विक्रम
भूमीचे बाबा मराठी तर आई हरयाणाची. मुंबईत भूमीचा जन्म झाला 18 जुलै 1989ला. जुहूच्या आर्य विद्या मंदिरात भूमी शिकली. लहानाची मोठी झाली. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सातवीत असताना भूमी फिजिक्स विषयात नापास झाली होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर कर्ज काढून भूमी विसलिंग वूड्समध्ये इंटरनॅशनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली. पण अटेंडन्सच्या कारणावरुन तिला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर वर्षभराच्या आतच भूमी यशराज फिल्ममध्ये कामाला लागली. यश राज फिल्ममध्ये भूमी असिस्टंट फिल्म डायरेक्टचं काम करत होती. यातून मिळालेल्या पैशात शिक्षणासाठी घेतलंल कर्ज फेडण्यासाठी ती पैसे जमवत होती. सहा वर्ष तिनं तिथं काम केलं. दरम्यानच्या काळात तिने कॉमर्समधून आपलं ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं.
हेही वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘टप्पू’ आहे पत्रकार
दम लगा हैश्या या सिनेमांतून पदार्पण करण्याआधी भूमीने चक दे आणि रॉकेट सिंह या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. सोबत ती मुंबईत एक्टर बनण्यासाठी आलेल्यांचं कास्टिंगही करायची. त्याचवेळी आपल्याला एका सिनेमात रोल मिळाला पाहिजे, असं तिला वाटू लागलं. अखेर भूमीला दम लगा कै हैश्यामध्ये रोल मिळाला. हा रोल मिळाल्यानंतर खरं चॅलेंज होतं, ते वजन आणखी वाढवण्याचं. संध्याची भूमिका साकारण्यासाठी भूमीने तब्बल १२ किलो वजन वाढवलं. त्यासाठी रोज बटर, चीज, वजन वाढवण्यासाठी जे जे खावं लागतंते सगळं खाल्लं. ही गोष्टी वाटते तितकी सोप्पी नाही. पण हार न मानता भूमीने वजन वाढवलं आणि त्यानंतर साकारलेल्या भूमिकेतून तिचं जे नाव झालं, ते आजही लोकांच्या ओठी कायम आहे.
संध्याच्या रोलसाठी भूमी पेडणेकरला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट पदापर्णासाठीच्या पुरस्करानं भूमीला गौरवण्यात आलं. यानंतरत इंटरनॅशनल अकॅडमी अवॉर्डनेही भूमीला संध्याच्या रोलसाठी सन्मानित केलं. झी सिने अवॉर्ड, स्क्री अवॉर्ड, बिग स्टार एन्टरटेनमेन्ट अवॉर्ड, हे आणि असे कित्येक अवॉर्ड भूमीने आपल्या नावावर कोरले. आपल्या पहिल्या सिनेमापासूनच सुरु झालेला हा जबरदस्त प्रवास भूमीने तसाच सुरु ठेवला.
दम लगा कै हैश्या या सिनेमानंतर भूमीने आपल्या शरीरावर प्रचंड मेहनत घेतली. वजन कमी केलं. इतकं की दम लगा कै हैश्या मधली भूमी हीच आहे, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही.
भूमि आपल्या रिल लाईफ पेक्षा रियल लाइफमध्ये खूप जास्त ग्लॅमरस आहे. भूमिने बॉलिवूडमध्ये जेव्हा पदार्पण केलं तेव्हा तिचं वजन ९५ किलो एवढं होतं. पण त्यानंतर तिने आपलं वजन बरंच कमी केलं. भूमि पेडणेकरचं नेहमी असं म्हणणं असतं की, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी स्वत:ला त्यासाठी तयार करा. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा उपाशी राहतात. पण असं करण्याची काहीही गरज नाही. जर आपण उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्यास तुम्ही आजारी पडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे असं अजिबात करु नका. तर पोषक आहार आणि योग्य व्यायाम गरजेचा आहे.
वजन कमी केल्यानंतर भूमी पेडणेकरचा लूकच बदलला. ती अधिक ग्लॅमरस वाटू लागली. दम लगा कै हायश्यानंतर टॉयलेट एक प्रेम कथा हा भूमीचा सिनेमा गाजला. घरात शौचालय असणं कसं गरजेचंय, हे सांगणारा आशयगहन सिनेमा भूमीने केला. या सिनेमानेही प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र त्याआधी भूमीनं वेब सीरिजमध्ये पाऊल ठेवलं. मॅन्स वर्ल्ड नावाची एक वेब सीरीज भूमीनं केली. पण जर कोणत्या वेबसीरिजसाठी भूमी लक्षात राहिली असेल, तर ती लस्ट स्टोरीज साठी. झोया अख्तर दिग्दर्शित लस्ट स्टोरीजच्या एका कथेत भूमीने आपली एक वेगळी छाप सोडली.
वेब सीरिजसोबतच अनेक सिने दिग्दर्शकांची रांगच भूमीकडे लागली, असं म्हणायला हरकत नाही. एका-पाठोपाठ एक जबरदस्त सिनेमे भूमीने यानंतर केले. शुभ मंगल सावधान, सोनचिरीया, सांड की आख, बाला, पत्नी पत्नी ओर वो, शुभ मंगल ज्यादा सावधान, भूत, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, दुर्गावती, ही यादी काही आता थांबायचं नाव घेत नाही….
बधाई हो, या सिनेमाच्या सिक्वलमध्येही आता भूमी झळकणार आहे. अक्षय कुमार, आयुषमान खुराना, राजकुमार राव, सुशांत सिंह राजपूत, विकी कौशल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत भूमीने स्क्रीन शेअर केलीये.
चांगली कथा असेल तर कोकणीतही चित्रपट करेन, असं भूमीने काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं. चांगल्या अभिनेत्यला किंवा कलाकाराला कोणतीच भाषा बंधनात अडकवू शकत नाही, हेच भूमीला यातून सांगायचं होतं. आतापर्यंत तिनं केलेले सिनेमे फक्त गोव्यातच नाही, तर गोव्याबाहेरीलही लाखो जणांना भावलेत.. आणि नेहमीच भावत राहतील, यात शंका नाही.
हेही वाचा – टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?