सेव्हिंग लेनिनग्राड : रक्तरंजीत संघर्ष

दुसर्‍या महायुध्दात रशियाच्या लेनिनग्राड शहरातील सामान्य नागरिकांनी हिटलरच्या नाझी सेनेला केलेला कडवा प्रतिकार जगाच्या इतिहासात आदरणीय आहे. ही लढाई लेनिनग्राड शहरातील घराघरात लढली गेली होती.

Goan Varta Live | प्रतिनिधी

दीपक ज. पाटील

सन 2019 साली एका सत्यकथेवर आधारीत प्रदर्शित झालेला सेव्हिंग लेनिनग्राड हा रशियन चित्रपट बहुचर्चीत ठरला. ही रशियन फिल्म अ रोड ऑफ लाईफ, द ट्रॅजिडी ऑफ ब्लड या पुस्तकावर आधारीत आहे. त्यामध्ये दि. 16 आणि 17 सप्टेंबर 1941 रोजी लेनिनग्राडच्या लाडोगा लेक समुद्रखाडीवर जर्मन सेना आणि रशियन रेड आर्मी तसेच सामान्य नागरिक यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.

फिल्मचे दिग्दर्शन अलेक्से कोझलोव याचे आहे. मूळ चित्रपट रशियन भाषेतच असल्यामुळे त्यामधील सर्व कलाकार रशियनच आहेत. रशियन समजत नसेल तर तो इंग्लीश सबटायटल्ससोबतच पहावा लागतो. दुसर्‍या महायुध्दादरम्यान सोविएत युनियनच्या लेनिनग्राड शहरातील काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात रशियन सरकारकडून घेतला जातो.

त्यामध्ये प्रशिक्षणार्थी जवान कॅडेट गनर कोस्ते गोरेलोव आणि त्याची प्रेयसी नास्त्या टकाचयोवा यांचाही समावेश आहे. या तरुण जोडप्यासह 1 हजारहून अधिक लोकांना एका गनशिपला जोडलेल्या बार्ज 752 नावाच्या जहाजातून दुसर्‍या शहरात पाठवण्याचा निर्णय होतो. कोस्तेचे वडील निकोलाय गोरेलोव यांच्या आदेशानुसारच बार्ज 752 मधून क्षमतेपेक्षा अधिक लोकांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो.

जहाजात वादीम पेट्रुचिक नावाच्या रशियन तपास अधिकार्‍याचाही समावेश आहे. जो नास्त्याच्या वडिलांची राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याबाबत तपास करीत आहे. जहाज रवाना होण्यापुर्वी अचानक त्यातून निघालेल्या 50 जवानांना किनार्‍यावरच थांबून जर्मन सेनेचा प्रतिकार करण्यास सांगितले जाते. ही मोहिम जीवघेणी ठरणार हे माहित असल्यामुळे कोस्तेला त्याच्या वडिलांकडून त्या जवानांच्या टीममधून बाहेर काढण्यात येते.

इकडे जहाजाचा प्रवास सुरु होतो आणि तिकडे त्यामधून बाहेर पडलेल्या जवानांचा बिचवरच नाझी सेनेशी रक्तरंजीत संघर्ष. लढाईची ही दृष्ये सेव्हिंग प्रायवेट रायन फिल्ममधील बिच वॉरपेक्षाही अधिक प्रभावीपणे साकारण्यात आली आहेत. मशिनगनमधून गोळ्यांचा वर्षाव सुरु असताना समोरासमोरील लढाईची भिषणता, काळजाचा थरकाप उडवरा थरार उच्च निर्मितीमुल्यांसह यावेळीच्या सीन्समधून पहायला मिळतो.

अखेर 50 च्या या तुकडीमधील फक्त 6 रशियन जवान जर्मन मशिनगन्सपुढे बचावू शकतात. परंतु शेवटी ते आपली मोहिम फत्ते करुन सर्व नाझी तुकडीचा सफाया करुन छोट्या बोटीने पुन्हा बार्जच्या दिशेने निघतात. इकडे बार्ज समुद्र वादळात अडकते आणि त्यामध्ये पाणी भरु लागते.

कोस्ते आणि इतर काही जवान हँडपंपाचा वापर करुन जहाजातील पाणी बाहेर काढू लागतात. पाणी बाहेर काढणे संपता संपताच त्यांच्यावर दुसरे जीवघेणे संकट ओढावते. जर्मन एअर फोर्सची दोन फायटर प्लेन्स बार्जवर बेछूट फायरिंग आणि बॉम्बवर्षाव करुन हाहाकार माजवून देतात. यामध्ये बार्जमधील 460 लोकांचा दुर्दैवी अंत होतो.

चित्रपटात हा भीषण हल्ला तर इतक्या वास्तव पध्दतीने दाखवण्यात आला आहे की फायटर प्लेनमधील मशिनगनच्या गोळ्या आपल्या कानाशेजारुनच जात असल्याचा भितीदायक भास झाल्याशिवाय राहिला नाही. या फायटर विमानांचा कसातरी बंदोबस्त केल्याशिवाय आपण बचावू शकणार नाही हे कोस्तेच्या लक्षात येते.

मग तो इतर काही जवानांसह वॉरशिपमधील सामान्य बंदुका घेउन डेकवर चढतो. परंतु गोळ्या आणि आग ओकणार्‍या लढाउ विमानांपुढे त्याचा प्रतिकार कितपत प्रभावी ठरतो, हे प्रत्यक्ष चित्रपटातच अनुभवणे उत्तम ठरेल. कोस्ते आणि नास्त्याच्या प्रेमकथेला वादीमचा एकतर्फी तिसरा कोनही जोडण्यात आला आहे. त्यामधून हिंसाचाराच्या आगडोंबातच अल्पसा भावनाकल्लोळही पहायला मिळतो.

केवळ 1 तास 37 मिनिटांची ही रशियन वॉर फिल्म दीर्घकाळापर्यंत संस्मरणीय ठरणारी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!