दुःखद! राजीव कपूर यांचं ५८व्या वर्षी निधन

हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने राजीव कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे ते लहान भाऊ होते.

मंगळवारी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रणधीर कपूर यांनी त्यांना लगेचच इंलॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. रणधीर कपूर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले की,

आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलंय. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याला यश येऊ शकलं नाही.

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फारसे चित्रपट केले नाहीत. राजीव कपूर हे विशेषतः ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा शेवटचा चित्रपट होता.

ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलेलं. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.

कपूर घराण्यातील वर्षभरातील हा दुसरा मृत्यू आहे. गेल्याच वर्षी म्हणजे ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांचे कॅन्सरनं निधन झालं होते. त्यांच्या मृत्युच्या धक्क्यातून कपूर कुटुंब सावरण्याआधीच आता त्यांना आणखी एक धक्का बसलाय. राजीव कपूर यांनी जगाचा निरोप घेतलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!