‘मिस्टर बीन’ साकारणाऱ्या रोवन अ‍ॅटकिंसन यांचे निधन?

ट्विटरवर अनेकांनी ट्वीट करत निधन झाल्याचे म्हटले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मिस्टर बीन हे आयकॉनिक पात्र साकारणारे अतिशय लोकप्रिय अभिनेते रोवन अ‍ॅटकिंसन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. रोवन यांच्या निधनाच्या चर्चा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण आता या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलिट

अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलने सोशल मीडियावर रोवन अ‍ॅटकिंसन यांचे निधन झाल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्वीट करत ‘फॉक्स ब्रेकिंग न्यूज, मिस्टर बीन (रोवन अ‍ॅटकिंसन) यांचे वयाच्या ५८व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे’ अशी माहिती दिली. पण काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलिट केले आहे.

अनेकांनी केले सोशल मीडियावर ट्वीट

रोवन यांच्या निधनाच्या अफवा सुरु झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर ट्वीट केले होते. असे पहिल्यांदाच झालेले नाही की रोवन यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या आहेत. यापूर्वी देखील त्यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. २०१७मध्ये त्यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवा सुरु होत्या. तेव्हा देखील रोवन यांनी वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

‘मिस्टर बीन’ भूमिकेसाठी अधिक लोकप्रिय

लहानांपासून ते अगदी मोठ्यांच्या चेहऱ्यावरही आपल्या अतरंगी खुरापतींनी हसू उमटविणारे रोवन अ‍ॅटकिंसन आजही त्यांनी साकारलेल्या ‘मिस्टर बीन’साठी अधिक ओळखले जातात. रोवन अ‍ॅटकिंसन यांनी अभिनय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिजमध्ये काम केले होते. ‘ब्लॅकॅडर’सारख्या विनोदी सिरिजमध्ये त्यांच्या मग्रूर ब्रिटिश उमरावाच्या भूमिकेने धम्माल उडवली होती. १९७८ मध्ये ‘बीबीसी रेडिओ ३’ या वाहिनीवर त्यांचा ‘द अ‍ॅटकिंसन पिपल’ ही विनोदी कार्यक्रमाची मालिका विशेष गाजली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!