जितेंद्रीय संगीत

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी


महेश दिवेकर

आमचा लहान गोवा कलाकारांनी भरलेला आहे. इथे अनेक गायक, संगीतकार, अभिनेते होऊन गेले, आहेत. मंगेशकर घराणे हे मंगेशीचे हे आपण जाणताच, आणखी एक महान गायक, संगीतकार या गावात जन्मला. पं. जितेंद्र अभिषेकी. 21 सप्टेंबर 1932 हा त्यांचा जन्मदिवस. 

त्यांचे वडिल बाळूबुवा हे मंगेश देवस्थानाचे पुजारी. ते कीर्तन करत. गायनही शिकले होते. घरात संगीताचे वातावरण असल्याने लहान वयातच जितेंद्र यांना गायक व्हायची ओढ लागली. मुंबई, पुणे, बेळगाव येथे राहून त्यांनी अनेक गायकांकडून गायनाचे धडे गिरवले. त्यात खादीम हुसेन खाँ, गिरीजाबाय केळेकर, अजमल हुसेन खाँ, जगन्नाथबुवा पुरोहित, मास्टर नवरंग, पं. रत्नकांत रामनाथकर अशा अनेक गायकांचा समावेश होता. खूप कष्ट, त्रास घेऊन जितेंद्र शिकले. मुंबई केसरबाई बांदोडकर, प्रफुल्ला डहाणुकर यांनी त्यांना आर्थिक मदतही केली. त्यांना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्तीही मिळाली होती. 

पुढे जितेंद्र मुंबई आकाशवाणीच्या कोकणी विभागात कामाला लागले. तेथे बातम्यांचा अनुवाद, नाटकात काम, डबिंग ही कामेही त्यांनी केली. तेथे बाकीबाब बोरकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. बाकीबाब यांच्या पोरजेचो आवाज या नियतकालिकात ते लेखनही करीत असत. पोर्तुगीज भाषेचे ट्युशनही ते देत. नंतर मात्र त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ गायनावर लक्ष केंद्रीत केले. 

गोपाळकृष्ण भोबे यांनी त्यांची शिफारस गोवा हिंदू असोसिएशनकडे केली. त्यांना नाटकासाठी संगीतकार हवा होता. नंतर घडला तो इतिहास. जितेंद्र यांनी संगीत दिलेले प्रत्येक नाटक गाजले. त्यात संगीताचेही योगदान होते, हे नाकारता येणार नाही. कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, हे बंध रेशमाचे, संत गोरा कुंभार, धाडिला राम तिने का वनी, अमृतमोहिनी अशा सतराहून जास्त नाटकांना त्यांनी अजरामर संगीत दिले. 

रामदास कामत, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, राजा काळे हे त्यांचे काही शिष्य. 1988 साली जितेंद्र यांना पद्मश्री किताब मिळाला. विष्णू वाघ यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. 7 नोव्हेंबर 1998 रोजी या महान गायकाचा सूर कायमचा शांत झाला. मात्र, त्यांच्या गायनाची लोकप्रियता अजून टिकून आहे. त्यांची कोकणी गीते मुंबई आकाशवाणीवर लाईव्ह सादर केली जायची. त्यामुळे ती काळाच्या ओघात नाहिशी झाली. कदाचित काही मुंबई आकाशवाणीच्या लायब्ररींत धूळ खात पडली असतील. त्या दिसा वडाकडेन, गोंयचें नाव व्हड करूंक अशी अवघीच गीते उपलब्ध आहेत.

जितेंद्र यांची मराठी गाणी सांगायची झाल्यास, अनंता तुला कोण पाहू शके, अबीर गुलाल, आम्हा नकळे ज्ञान, कशी तुज समजावू सांग, काटा रुते कुणाला, कैवल्याच्या चांदण्याला, घेई छंद मकरंद, दिव्य स्वातंत्र्यरवी, नाही पुण्याची मोजणी, हे बंध रेशमाचे, हरिभजनाविण काळ, संतभार पंढरीत, सुहास्य तुझे मनास मोही, सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी, सर्वात्मका सर्वेश्वरा, शब्दावाचून कळले सारे, विष्णूमय जग, विश्वाचा विश्राम रे, बोलावा विठ्ठल, माझे जीवनगाणे, रंध्रात पेरिली मी, लागी कलेजवा कट्यार, हे सुरांनो चंद्र व्हा… आणि इतर.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!