गझल रुसली! इलाही जमादार यांच्या निधनानं चाहते हळहळले

Goan Varta Live | प्रतिनिधी
सांगली : ‘आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ असं म्हणत जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे मराठी गझलकार इलाही जमादार यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सदाबहार लेखणीनं त्यांनी गझल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवण्याचं मोलाचं काम केलं होतं. त्यांच्या गझल आजही तितक्याच अर्थपूर्ण आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या अशा आहेत.
कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझल क्षेत्रात जमादार यांचे नाव अदबीनं घेतलं जातं. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक गझल स्वरबद्ध केल्यात.
‘इलाही जमादार गेले! पुन्हा वेदनेचा आघात झाला!’, अशा शब्दांत शेतकरी कायद्यांचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी दुःख व्यक्त केलंय. इलाही जमादार यांच्या जाण्यानं मराठी गझलचं मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली जाते आहे. दुधगावला इलाही जमादार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जमादार यांचे चाहते त्यांच्या निधनानं हळहळले.
इलाही जमादार आज आपल्यात नसेल तरी त्यांनी लिहिलेले शब्द नेहमीच एका संवेदनशील मनावर कोरलेले राहतील यात शंका नाही. त्यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या काही खास गझलांचा हा नजराणा…
हे असे बागेवरी उपकार केले…
कत्तली करुनी फुलांचे हार केले
– इलाही

शब्दांचे अंतरंग जाणशील तर कळेल
अर्थांचे पोत पदर परखशील तर कळेल
मखमाली वाटेवर कळप चालतात फक्त
पायंडा तू नवीन पाडशील तर कळेल
लुबाडून वा लुटून सौख्य लाभले कुणास
जे आहे जवळ तुझ्या वाटशील तर कळेल
नयनरम्य सृष्टी ही जीवनही मधुर गोड
बघण्याचा दृष्टिकोन बदलशील तर कळेल
आरशास सांगतेस मनोगते तुझी सदैव
‘इलाही’स माळलेस भेटशील तर कळेल
– “इलाही जमादार”

पाखरांसाठी म्हणोनी लावले बुजगावणे
– इलाही जमादार
पीक घेवोनि फरारी जाहले बुजगावणे
सनसनाटी बातमीने थक्क झाले गावही
पाखरांनी खून केला मारले बुजगावणे