इफ्फीत गोवा विभागात झळकणाऱ्या सिनेमांची यादी आली!

ज्युरी गटाने केली ७ चित्रपटांतून निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात २००४ सालापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चे आयोजन होत आहे. त्यामुळे गोमंतकीय सिनेमात विविध आघाड्यांवर कमालीचा सकारात्मक बदल घडून येत आहे. कोकणी चित्रपट पाहताना त्याची हमखास प्रचिती येते. यंदाच्या इफ्फीतही खास गोवा सेक्शनमध्ये प्रीमियर आणि नॉन प्रीमियर अशा दोन विभागांत चित्रपट पाहता येतील. यंदा २ चित्रपटांची निवड झाली आहे.

यंदा ५१वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ जानेवारीपासून राजधानी पणजीत साजरा होत आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यंदा गोवा सेक्शनसाठी एकूण सात चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यात प्रीमियर विभागात ५ (१ फिचर आणि ४ नॉन फिचर), तर नॉन प्रीमियर विभागात २ (१ फिचर आणि १ नॉन फिचर) चित्रपटांचा समावेश होता.

ज्युरी संजय कपूर, रजत नागपाल, रिधम जानवे यांच्या समितीने त्यातून दोन चित्रपटांची निवड केली आहे. प्रीमियर सेक्शनमध्ये ‘शिवर’ हा लघूपट (मांंगिरीश बांदोडकर व प्रवीण पारकर निर्मित), तर नॉन प्रीमियम विभागात ‘रिटन ईन द कॉर्नर्स’ या आयुष कामत निर्मित लघुपटाची निवड करण्यात आली.

गोव्यातील चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी गोवा मनोरंजन सोसायटीच्या माध्यमातून २०१४ पासून इफ्फीत खास गोवा सेक्शनची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे गोवन फिचर आणि नॉन फिचर चित्रपट दाखवले जातात. गोव्यातील चित्रपट क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी इफ्फीचे कायमस्वरुपी स्थळ निर्माण करण्यात आले. चित्रपट रसिकांना यंदाच्या गोवा विभागातील चित्रपट नक्की आवडतील, अशी खात्री आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!