‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार

कासवांच्या प्रजातींची माहिती देणारा लघूचित्रपट. कासव संवर्धन करण्यासाठी सिंधुदुर्गमधील मच्छिमार घेत असलेल्या मेहनतीचे दर्शन.

Goan Varta Live | प्रतिनिधी

स्वप्नील लोके
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार समाजावर आधारित चित्रीकरण करण्यात आलेल्या ‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ (guardians of the turtles) या लघूचित्रपटाला ‘नेचर इन फोकस’ या राष्ट्रीय संस्थेतर्फे दिले जाणारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या चित्रपटात देवगड महाविद्यातील प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी काम केले असून समुद्री कासवांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

नेचर इन फोकस या संस्थेकडून एकूण पाच वेगवेगळ्या प्रकारांत विजेते निवडण्यात आले. त्यामध्ये उदयोन्मुख प्रतिभा : संवर्धन (कॉन्झरवेशन) या प्रकारात ‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ या लघूचित्रपटाला पहिले पारितोषिक मिळाले. या चित्रपटात विविध कासवांच्या प्रजातींची माहिती देताना त्यांचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यातील मच्छिमार समाज घेत असलेल्या मेहनतीचे सचित्र दर्शन करून दिले आहे.

प्राध्यापक नागेश दप्तरदार हे सन 1992 पासूनच या समाजाला सोबत घेऊन कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करणे, त्यातून पिल्ले आल्यावर त्यांना समुद्रात सोडणे असे करत आहेत. त्याचाच एक भाग दरवर्षी जिल्हातील विविध समुद्र किनारी असे कासवांचे संवर्धन करण्याचे कार्य प्राध्यापक नागेश दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

पारंपारिक पद्धतीने मच्छिमारी करताना अनेक अडचणी येत असूनही आणि पूर्वीपेक्षा 50 टक्के पेक्षा कमी प्रमाणात मासे मिळूनही जिल्ह्यातील मच्छिमार समाज या संवर्धनात सहभागी आहे. पूर्वी एकही कासवाचे पिल्लू समुद्रात सोडले जात नसे, परंतु प्राध्यापक नागेश दप्तरदार यांच्या प्रयत्नाने दरवर्षी 13हजार पिल्ले समुद्रात सोडली जातात. त्यांच्या याच कार्याचे दर्शन ‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ या लघूचित्रपटात चित्रित करण्यात आले आहे. त्याचीच दाखल घेऊन या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.या चित्रपटात तांबळडेग येथील स्थानिक मच्छिमार व कासव प्रेमी सागर मालडकर आणि तोंडवली गावाचे सरपंच व पर्यावरण प्रेमी आबा कांडेकर यांनी काम केले आहे.

या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन नमन गोविल आणि मिथुन यांनी केले आहे. नेचर इनफोकस ही राष्ट्रीय पातळीवर प्राणी संवर्धनावर काम करणारी संस्था असून या फिल्म फेस्टिव्हलचे हे दुसरे वर्ष आहे. बंगळूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात स्पर्धेचे ऑनलाईन माध्यमातून विजेते निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण 120 चित्रपटांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे रिटा बॅनर्जी, आकांक्षा सूड सिंग, जोन्ना अँडरसन, गौतम पांडे, रघु चुंदावत या नामांकित छायाचित्रकरांनी व दिग्दर्शकांनी परीक्षण करून सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले. यामध्ये उदयोन्मुख प्रतिभा : संवर्धन या गटातून ‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ या लघूचित्रपटाने बाजी मारली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!