बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याच वेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेण्ड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खासकरुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचं गाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोनं किती आवडतं हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठावूक आहे.
२७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेले बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी ‘नन्हा शिकारी या चित्रपटापासून त्यांनी करिअरला सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढं सोनं घालण्यामागचं कारण सांगितलं.
तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं.
हेही वाचा
टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण