आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी ‘पगल्या’चा डंका !

'पगल्या' ला प्रतिक्षा कोरोनाचा पडदा उघडण्याची !

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

पणजी : चित्रपटसृष्टीसाठी कोरोनाचा कालावधी अतिशय वेदनादायी असला तरी मराठी चित्रपटांसाठी हा सुवर्णकाळ ठरला आहे तो ‘पगल्यामुळे. निर्माते-दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या मराठी चित्रपटाने कोविड काळात भारतीय चित्रपटांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व करत अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपली मोहोर उठवली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट रसिक आणि समीक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट प्रदर्शनासाठी मात्र कोरोनाचा पडदा उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे.

अनेक शाॅर्ट फिल्म, व्हिडीओ अल्बम यांच्या माध्यमातुन कार्यरत असणारे प्रसिध्द फिल्ममेकर विनोद पीटर यांनी या लक्षवेधी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अतोनात परिश्रम घेतले आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास सांगताना ते म्हणाले, एका शाॅर्टफिल्मसाठी डाॅ. सुनिल खराडे यांनी ही कथा लिहीली होती. मात्र यावर खुप चांगला चित्रपट होवू शकतो, असे लक्षात आल्याने चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. पगल्या ही दोन मुलांची आणि पगची कथा आहे. दहा ते बारा वर्षांचे वृषभ आणि दत्ता. वृषभ हा शहरी, आणि दत्ता हा ग्रामीण भागातला. दोघे एकमेकांना कधीच भेटले नाहीत, परंतु दोघांनाही पग कुत्रा पाळण्याची खुप इच्छा होती. वृषभला भेट म्हणुन पग मिळतो. एक दिवस वृषभकडुन हा पग हरवतो आणि तो दत्ताला सापडतो. निरागस मुलांच्या भावना एका प्राण्यात कशा गुंतलेल्या असतात, याची अतिशय भावस्पर्शी अशी ही कथा आहे. पुणे आणि परिसरात या चित्रपटाचे शुटींग पार पडले. लाॅकडाउन सुरू होण्यापूर्वी शुटींग पुर्ण झाले, परंतु पोस्ट प्राॅडक्शनला खुप अडचणी आल्या. मी मुंबईत रहात होतो. पोस्ट प्राॅडक्शन पुण्यात सुरू होते. वर्क फ्राॅम होम, तसेच आॅनलाईन काम करून आम्ही हा चित्रपट पुर्ण केला. त्यानंतर इटली, भारत, अमेरीका, युके आणि स्वीडन या देशातील 19 चित्रपट महोत्सवात हा चित्रपट स्वीकारला जाणे, हे पहिल्याच टप्प्यातील मोठे यश होते.

एकीकडे कोविड प्रार्दुभावामुळे चित्रपटसृष्टी संकटात असतानाही विनोद पीटर यांनी अतिशय जिददीने या चित्रपटाचे स्वप्न पुर्ण केले. भारतात थिएटर मिळू शकत नसले तरी या मराठी चित्रपटाने जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांचे प्रतिनिधीत्व करत मराठीची पताका फडकवली आहे.

कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रिमीयर फिल्म अॅवाॅर्डस या पुरस्कार सोहळयात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक विनोद पीटर, सर्वोत्तम अभिनेता गणेश शेळके, सर्वोत्तम अभिनेत्री पुनम चांदोरकर, सर्वोत्तम पार्श्वसंगीत संतोष चंद्रन, सर्वोत्कृष्ठ सिनेमॅटोग्राफर राजेश पीटर असे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत. जगभरातील चित्रपटरसिकांना जिंकणा-या या चित्रपटाला आता प्रतिक्षा आहे ती केवळ कोरोनाचा पडदा उघडण्याची…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!