शाहरुखला ‘मुस्लीम सुपरस्टार’ म्हणाल्याने दोन वरिष्ठ पत्रकारांमध्ये ट्विटर वॉर

आर्यन खानवरील कारवाईवरुन नेटकऱ्यांमध्ये मतांतरे सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानवरुन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन नेटकऱ्यांमध्ये मतांतर सुरु असून यावरुन अनेक वाद-प्रतिवाद होताना दिसत आहेत. लोक दोन गटात विभागले असून काही जणांनी तर या कारवाईचा संबंध थेट धर्माशी जोडला आहे. शाहरुख खान मुस्लीम असल्याने त्याला त्रास दिला जात असल्याचा त्यांचा दावा आहे.

वरिष्ठ पत्रकार आरफा शानम शेरवानी आणि अनंत विजय यांच्याच खडाजंगी

दरम्यान यावरुन दोन वरिष्ठ पत्रकार आरफा शानम शेरवानी आणि अनंत विजय यांच्या ट्विटरवर जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. आरफा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, आर्यन खान प्रकरणात त्याचा ड्रग्जचं सेवन करण्याशी काही देणं-घेणं नाही, मात्र शाहरुखवर निशाणा साधला जात आहे. या देशात आर्यन खानला जामीनाच्या मुलभूत अधिकारापासून दूर ठेवलं जात आहे. शाहरुख आजच्या काळातील सर्वात मोठा मुस्लीम सुपरस्टार आहे यामध्ये दुमत नाही, पण सध्या सुरु असलेली ‘शिक्षेची प्रक्रिया’ त्याला रांगेत उभं राहण्याचा संदेश आहे.

कोण काय म्हणाले?

यावर अनंत विजय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, मुस्लीम सुपरस्टार? या देशात तुमच्यासारखे लोकच हिंदू-मुस्लीम विभाजन करतात.

याला उत्तर देताना आरफा खानम शेरवानी यांनी म्हटलं की, बरोबर बोललात तुम्ही.. माझ्याच धोरणांमुळे देश हिंदू-मुस्लीम यात विभागला गेला आहे. मीच देशातील लोकशाही संस्था कमकुवत करत असून धर्मनिरपेक्ष राज्यघटना बदलून ‘हिंदू राष्ट्र’ करु इच्छित आहे.

यानंतर अनंज विजय यांनी आरफा खानम शेरवानी यांची विचारसरणी जिन्नासारखी असल्याचा उल्लेख करत म्हटलं की, तुम्ही एका अशा अभिनेत्याला मुस्लीम केलं आहे, ज्याच्यावर संपूर्ण देश प्रेम करतो. तुमची हीच विचारसरणी जिन्नासारखी आहे. आता शाहरुखवर चर्चा होत आहे तर त्याचवरच राहा. राज्यघटना, लोकशाही, हिंदू राष्ट्र या सर्वांव बोलू शकतो, पण आता भरकटवू नका.

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानचा जामीन अर्ज मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगरदंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. आर्यन खानला कोर्टाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. आर्यन खान २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यनच्या वकिलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!