आबे फारीया कोण होता?

तुम्ही कधी गोव्यातील पणजी शहराला भेट दिलीय का? पणजीत जुन्या सचिवालयाजवळ एक विचित्र पुतळा आहे. त्या पुतळ्यात दोन व्यक्ती दिसतत. पायघोळ अंगरखा घातलेला एक पुरुष एका महिलेला संमोहित करताना दिसतो. कोण तो पुरुष जो त्या बाईला संमोहित करतोय? त्या पुतळ्याखाली त्या पुरुषाच्या नावाची पाटी आहे. त्याचे नाव आहे, आबे दि फारीया!

Goan Varta Live | प्रतिनिधी

डॉ. रुपेश पाटकर, (मनोविकारतज्ञ, उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम)
आबे दि फारीया! नावावरून तो कोणीतरी पोर्तुगीज माणूस असल्याचा समज होतो. पण तो पोर्तुगीज नाही. तो अस्सल गोवेकर आहे. तो कोलवाळच्या अंतू शेणवे यांचा वंशज. त्याची आई कंदोळीच्या डिसोझा भाटकाराची मुलगी. पण कंदोळीच्या डिसोझा भाटकाराचे पूर्वज केंकरे. म्हणजे आबे फारीया हा पूर्णपणे भारतीय वंशाचा माणूस.

पुतळ्यावरून लक्षात येते की आबे फारीया हा संमोहनतज्ज्ञ. पण संमोहन करणारे तर अनेकजण असतात. मग या आबे फारीयचा एवढा मोठा पुतळा उभारण्याचे आणि तोदेखील पणजीत मध्यवर्ती ठिकाणी उभारण्याचे कारण काय? आणि तो उभारलाय चक्क पोर्तुगीज राजवटीत. पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी त्याचा पुतळा उभारला याचा अर्थ तो पोर्तुगीज सत्तेशी एकनिष्ट होता का? छे! बिलकुल नाही! उलट तो आणि त्याच्या बापाने म्हणजे कायतान फारीयाने गोव्यातील पोर्तुगीज सत्ता उलथून टाकण्यासाठी १७८७ साली झालेल्या पिंटोच्या बंडात सहभाग घेतला होता आणि या बंडात सहभागी झाल्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागली होती. हे बंड शिजले तेव्हा तो पोर्तुगालची राजधानी लिसबनला होता. अटक चुकवण्यासाठी तो पॅरिसला पळून गेला आणि मरेपर्यंत त्याला तिथेच राहावे लागले. तो कधीच ना गोव्यात परत येऊ शकला ना लिसबनला परतू शकला. त्याच्या वडिलांना बंडातील सहभागामुळे अटक झाली, त्यांचे पुढे काय झाले ते कळले नाही.

आबे फारिया पॅरिसला पोचला, ते फ्रेंच राज्यक्रांतीचे दिवस होते. आणि हा पठ्या फ्रेंच राज्यक्रांतीत सहभागी झाला. त्याच्या फ्रेंच क्रांतीतील सहभागादरम्यान त्याची मारकुस पेयुसेगार या क्रांतिकारकाशी भेट झाली. त्या मारकुसकडून तो संमोहन शिकला. पण नुसतेच संमोहन शिकला नाही तर संमोहन म्हणजे नक्की काय याची तो चिकित्सा करू लागला. त्या काळात संमोहन म्हणजे दैवी शक्ती असे मानले जाई. अशी शक्ती काही विशेष लोकांमध्येच असते असा प्रचार मेस्मर नावाच्या एका जगप्रसिद्ध संमोहनकर्त्याने चालवला होता. आबे फरीयाने आपल्या संशोधनाने मेस्मरचा दैवी शक्तीचा दावा खोटा ठरवला आणि संमोहन म्हणजे सूचना ग्रहण करण्याची क्षमता असे त्याने मांडले. त्याच्या या विश्लेषणाने आधुनिक मानसशास्त्राला टर्निंग पॉइंट मिळाला.
खरे तर, सूचना माणसाच्या भावना बदलू शकतात, याचा एक गंमतीशीर अनुभव आबे फरीयला त्याच्या तरुणपणी मिळाला होता. तो पंधरा वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला गोव्याहून थेट पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिसबनला घेऊन गेले. त्या काळात गोव्याहून लिसबनला जायला जहाजाने तब्बल ९ महिने लागत. मोठ्या कष्टाने ते बापलेक लिसबनला पोचले. वडिलांनी मोठ्या खटपटी करून आबेला रोमच्या ‘प्रोपोगंडा फिडे’ कॉलेजात ख्रिश्चन पौरोहित्याच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला.

रोममधील आपले शिक्षण संपवून आबे फारीया लिसबनला परत आला. आपल्या मुलाला चांगला नावलौकिक मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे पाहिले प्रवचन राजदरबाराच्या चर्चमध्ये आयोजित केले, जेणेकरून मोठमोठे लोक त्याला ओळखू लागतील. पण त्याचा उलटाच परिणाम २४ वर्षांच्या नवख्या आबेवर झाला. मोठमोठ्या लोकांच्या पुढ्यात प्रवचन द्यावे लागणार याचेच त्याला टेन्शन आले. तो वेदीकडे जात असताना त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. आपल्या मुलाला आलेले टेन्शन त्यांना जाणवले. मुलाच्याजवळ जात ते कोंकणीत कुजबुजले, “ही सगळी भाजी, कातर रे भाजी”. हे सगळे लोक भाजीपाल्याप्रमाणे बिनडोक आहेत असे समज आणि बोलायला लाग. वडिलांच्या या शब्दांनी त्याची भीती नाहीशी झाली आणि त्याने निर्भयपणे प्रवचन दिले.

आबे फरीयाचे संशोधन क्रांतिकारी होते, त्यामुळे इतर शास्त्रज्ञांच्या वाट्याला जशी अवहेलना येते तशीच अवहेलना आबे फारीयाच्या वाट्याला आली. इतर पुरोहितांनी त्याची कुचेष्ठा केली. इतर संमोहंनकार्त्यांनी त्याच्यावर टीका केली. त्याला दोन वेळचे जेवण मिळवणेदेखील मुश्किल झाले. शेवटी २० सप्टेंबर १८१९ रोजी प्रचंड हलाखीत तो मरण पावला. एरवी तो कायमचा विस्मृतीत गेला असता, पण त्याने मृत्यूपूर्वी प्रकाशकाकडे छापायला दिलेल्या संशोधन ग्रंथामुळे तो अमर झाला. त्याच्या संशोधनाचे महत्व त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी तज्ज्ञांना समजले. सुप्रसिद्ध फ्रेंच न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शारको याने फारीयाची तत्त्वे मेडिकलच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज न्यूरोलॉजिस्ट, ज्याला वैद्यकशास्त्रातील संशोधनाबाबत नोबेल पुरस्कार मिळाला, त्या डॉ. इगोस मोनिस यांनी त्याचे चरित्र लिहिले.

२० सप्टेंबर ही त्या महान शास्त्रज्ञाची, आबे फारीयाची २०१ वी पुण्यतिथी. त्याच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!