उर्दूच्या मैफिलीतून उचलून आणलेला भावगीत गायक..! अरुण दाते

Goan Varta Live | प्रतिनिधी
साधारण १९४० सालची गोष्ट. लखनऊला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तरांच्या कोठीवर एक माणूस त्यांची गझल ऐकायला आला आहे. एरवी बेगम संध्याकाळी गात पण त्या दिवशी त्या माणसाचं उर्दू आणि गाण्याविषयीची समज बघून त्या गायला बसतात. ४-५ मिनिटानंतर तो माणूस बेगम यांच्या हार्मोनियमवर हात ठेवतो, त्यांचं गाणं थांबवतो आणि जाऊ लागतो. बेगम आश्चर्यचकित होऊन विचारतात, ‘मुझसे कोई गुस्ताखी हुई क्या?’..त्यावर तो माणूस उत्तरतो.. ’नाही. तुमचा रिषभ लागलेला मला आता कळला. याचा अर्थ तुमचा ‘सा’ कधीच लागून गेला. तुमचे स्वर हे इतके अद्भूत एकमेकांत मिसळले आहेत. आज मी हजार रूपये घेऊन आलो होतो. कारण माझ्याकडे तेवढेच आहेत. पण तुमच्या एकेका स्वरासाठी लाख रुपये दयावेत असे तुमचे स्वर आहेत. बेगम, मेरी औक़ात नही है की, मैं आपका गाना सुनू’. हे वाक्य ऐकल्यावर बेगम अख्तर ढसाढसा रडायला लागल्या. आणि त्यानंतर सगळ्या मैफिली रद्द करून बेगम फक्त त्या माणसासाठी रात्रभर गायल्या. तो माणूस होता रामूभैय्या दाते…! ज्येष्ठ भावगीत गायक श्री. अरूण दाते यांचे वडील.

दाते कुटुंब हे मध्यप्रदेशमधलं इंदोर इथलं. स्वत: रामूभैय्यांचं उर्दूवर प्रचंड प्रभुत्व आणि प्रेम. त्यामुळे त्यांनी आपल्या तीनही मुलांना मौलवींकडे उर्दू शिकायला पाठवलं. अरूणजींची सख्खी बहिण तर जगातल्या कुठल्याही मुसलमान माणसापेक्षासुद्धा उर्दू चांगलं बोलत असे. घरी बेगम अख्तरांचं सतत येण-जाणं. कुठलीही नवीन चाल बांधली की त्या रामभैय्यांना ऐकवायला लखनउहून इंदोरला येत. याशिवाय कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे यांच्या नेहमीच्या मैफिली. त्यामुळे उर्दू, गझल आणि गाणं याकडे अरूणजी नकळतच ओढले गेले.

अरूणजींना त्यांचे वडील कुमार गंधर्वंना देवासहून आणायला कार घेऊन पाठवत असत. एकदा गाडी चालवताना अरूणजींना कुमार गंधर्वांनी गुणगुणताना ऐकलं. कुमार गंधर्व त्यांना म्हणाले, अरे, तू आजकाल फार गुणगुणतोस, हरकती घेतोस..चल मी तुला गझल शिकवतो. अरुणजी विचारात पडले. कुमारजींकडून आपण काय शिकणार..आपली काय पात्रता त्यांच्याकडून शिकण्याची आणि ते काय शिकवणार असा विचार त्यांच्या मनात आला. कारण कुमार गंधर्वांना त्यापूर्वी कधीही कोणी गझल गाताना ऐकलं नव्हतं. पण कुमार गंधर्वांनी अरुण दातेंना गझल शिकवायचीच असा निश्चय केला होता. त्यांनी ‘बेहज़ाद लखनवी’ यांची एक गझल तयार केली. आणि आयुष्यात पहिल्यांदा अरुण दाते उर्दू गझल शिकले ते साक्षात कुमार गंधर्व यांच्याकडून. त्या गझलेचे शब्द होते…
सर-बह-सजदा, कैफ़ियत है, सोज़ है, और साज़ है|
मैं जहाँ पे खो गया हूँ, ये किसकी बज़्म-ए-नाज़ है|

ही त्यांच्या उर्दू गझल गायकीची अक्षरश: द्वेष वाटावा अशी सुरूवात. उर्दू भाषा आणि गझल यावर अरुणजींचं विलक्षण प्रेम. गझल शिकण्याची आणि गाण्याची सुरूवात झाली पण हे रामूभैय्यांना माहिती नव्हतं. ते कसं माहिती झालं याचाही मोठा मजेदार किस्सा आहे. पु.ल.देशपांडे एकदा इंदोरला अरुणजींच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमानंतर पु.ल. सगळ्या मुलांना घेऊन पिपलीया पाल नावाच्या एका जागी घेऊन गेले. आजूबाजूला छान झाडं होती. पु.लं.नी हार्मोनियम मागवली आणि ते गायला बसले. त्याचं गाणं झाल्यावर तुमच्या मुलांमध्ये कोणी गातं का असं त्यांनी विचारलं. तेव्हा एकाने अरुणजींकडे बोट दाखवलं. अरुणजी चांगलेच घाबरले. कारण पु.ल. आणि रामूभैय्या फार चांगले मित्र. तेव्हा आपलं खराब झालं तर ते बाबांना सांगतील ही अरुणजींना भीती होती. पण पु.लंच्या आग्रहामुळे त्यांनी कुमारजींनी शिकवलेली गझल पु.लं.ना ऐकवली. ती ऐकल्यावर पु.लंनी त्यांना तू रामूभैय्यांचा मुलगा का असं विचारलं. अरुणजींनी हो म्हणताच, ताबडतोब पु.ल. अरुणजींना घेऊन घरी गेले आणि रामूभैय्यांना विचारलं, तुमचा मुलगा काय कमाल गातो याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? ‘आफ़त आहे यार’..! ही त्यावर रामूभैय्यांची खास ‘इंदोरी’ प्रतिक्रिया..
वडिलांची आणि मुलाची अशी पहिली सांगितिक ओळख करुन देण्याचं श्रेय जातं ते पु.लं.ना..हा ही किती मोठा भाग्ययोग..

दाते मुंबईला शिकत असताना मुशायरे ऐकायला जात. विद्यार्थी दशेत फारसे पैसे नसल्याने ते शेवटच्या रांगेचे सर्वात स्वस्त तिकीट घेत. एकदा असेच ते मुशायरा ऐकायला गेले. त्यांच्या सोबत रांगेत रिक्षेवाले, टांगेवाले, कटलेवाले बसले होते. मुशायरा सुरू झाला. जेव्हा जिगर मुरादाबादी यांचं नाव पुकारल्या गेलं तेव्हा एक अद्भूत घटना घडली. रांगेतल्या गरीब लोकांनी आपल्या अंगातील नवीन कुर्ता फाडला आणि तो आकाशात भिरकावला. दात्यांनी या कृतीचा अर्थ विचारला तेव्हा एकानं सांगितलं, हे गरीब लोक आहेत. महिनाभर पैसे कमावून यांनी हा कुर्ता घेतला आहे. हा कुर्ता फाडून तो आकाशात भिरकावून ते अल्लाह ला सांगताहेत, अल्ला आम्ही कृतज्ञ आहोत, आम्हाला तू जिगर मुरादाबादी यांना ऐकण्याची संधी दिली..!! काय उत्कटता आहे, काय भावना आहेत!!!
दाते हा किस्सा सांगताना गमतीने म्हणत, आपले मराठी लोक साधा रुमाल तरी फाडतील का?
त्यानंतर मग अरुणजी ऑल इंडिया रेडिओच्या इंदोर, भोपाळ आणि ग्वाल्हेर स्टेशनवर गझल गाऊ लागले. त्यांना आकाशवाणीचे बी हाय ग्रेड मिळाले. तेही वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी. त्या काळात यशवंत देव हे ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई विभागाचे प्रमुख होते. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील रेडिओ स्टेशन लावून विविध गायकांची गाणी ऐकण्याचा छंद होता. एकदा असेच ते इंदोर रेडिओ लावून बसले असताना त्यांनी अरुण दातेंची गझल ऐकली. ती गझल ऐकल्यावर ते थक्क झाले. दाते म्हणजे हा मराठी माणूस आहे त्याचे इतके सफाईदार उर्दू उच्चार बघून ते चकित झाले. त्यांनी ताबडतोब श्रीनिवास खळ्यांना बोलावलं. खळ्यांनी दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी अरूणजींचं गाणं ऐकलं. श्रीनिवास खळे सांगतात, तो आवाज ऐकून मी चक्रावून गेलो.
त्यावेळी मराठीत असा खर्ज कोणाचाच लागत नव्हता. मग इंदोर स्टेशनवरून अरुणजींचा पत्ता या दोघांनी मिळवला. त्यावेळी अरुणजी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मुंबईलाच राहत होते. त्यांच्या मुंबईतल्या दादरच्या पत्त्यावर त्यांनी सलग तीन महिने गाण्याचे काँट्रॅक्ट पाठवले. पण अरुणजींकडून काहीही उत्तर न आल्याने शेवटी हे दोघं दादरला त्यांच्या घरी जाऊन धडकले. घरी रामूभैय्या दाते होते. त्यांना वरील सर्व हकीकत देव आणि खळे यांनी सांगितली. तेव्हा रामूभैय्यांनी रागावून अरुणजींना विचारलं की तू यांच्या पत्राचं, काँट्रॅक्टचं साधं उत्तरही दिलं नाही. अरुणजी म्हणाले, ‘बाबा आपली इंदोरची मराठी ऐकून हे पुण्यामुंबईचे लोक हसतात. ते माझं गाणं काय ऐकतील..म्हणून मी सर्व काँट्रॅक्ट फाडून टाकले’. त्यावेळी रामूभैय्यांनी त्यांना फार सुंदर उत्तर दिलं. ‘बेटा, स्वराला भाषा नसते. खळे हे मोठे संगीतकार आहेत. ते म्हणतील तसं तू कर.
खळ्यांनी त्यावेळी ‘शुक्रतारा’ हे भावगीत खास अरुण दात्यांसाठी कंपोझ करुन आणलं होतं.’ अरुण दाते सांगतात, ‘ते ऐकल्यावर मला लक्षात आलं की, या माणसानं माझ्या आवाजाचा किती बारकाईने अभ्यास केला होता’.

शुक्रताराचे कवी मंगेश पाडगावकर यांनी सांगितलं की, तब्बल ११ वेळा ती चाल श्रीनिवास खळ्यांनी अरुण दात्यांसाठी बदलवली. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी केशवराव भोळे, पु.ल. देशपांडे, रामूभैय्या दाते, गायक म्हणून अरुण दाते आणि गायिका सुधा मल्होत्रा, संगीतकार श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि संगीत संयोजक अनिल मोहिले इतकी दिग्गज माणसं उपस्थित होती. संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांचं ते पहिलं गाणं हा ही एक इतिहासच. आणि म्हणूनच आज ५५ वर्षानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे.


त्यानंतर अरुण दाते यांची पुढची १० गाणी अक्षरश: लोकप्रियतेच्या चरम शिखरावर गेली. पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘साक़िया’ हा उर्दू गझलांचा अल्बमही काढला. त्यात प्रामुख्याने क़ैसर उल ज़ाफरी आणि निदा फाज़ली यांच्या गझला आहेत. ‘दिवारों’ से मिलकर रोना’ ही क़ैसर उल ज़ाफरी यांची गझल अरुणजींना खूप आवडायची. म्हणून बसल्या बसल्या त्याच मीटरमध्ये क़ैसर साहेबांनी एक गझल लिहीली.
आईने से आँख मिलाते डर सा लगता है|
सारा चेहरा टूट चुका हो ऐसा लगता है|
ही ती गझल.
आपल्या ‘साक़िया’ या अल्बममध्ये त्यांनी ही गायली आहे. पण मराठी भावगीत गायनामुळे त्यांची उर्दू गझल मागेच पडली. क्वचित त्यांच्या बोलण्यात याची खंतही येत असे. ‘अरे यार, मला मराठीने मारुन दिलं’. असं ते हसत हसत म्हणत. पण ही आनंदाची खंत होती. त्यात अर्थातच तक्रार नव्हती.
अरुणजींच्या आवाजातली कातरता, हळुवारपणा, शब्दांना ट्रिट करणं, हा उर्दू गझलेचाच परिणाम आहे असं मला वाटतं. शब्दांची त्यातल्या भावाची प्रचंड जाण असणारा माणूसच उर्दूवर प्रेम करू शकतो. म्हणूनच ते गाण्याच्या निवडीबाबत अत्यंत काटेकोर होते. कोणालाही सहज वाटेल की, अरुणजींनी आयुष्यात किमान १००० तरी भावगीतं गायली असतील. पण आपल्या अख्ख्या आयुष्यात त्यांनी केवळ १०० ते ११५ गाणी गायलीत. उर्दूतली अदब, सुसंस्कृतपणा, उत्कटता, समर्पण त्यांनी जसंच्या तसं मराठीत भाषांतरीत केलं. व्यक्तिमत्वाचंच भाषांतर होतं ते असंही म्हणता येईल. लखनऊतला एखादा बहिरा माणूस दातेंच्या भावगीताच्या कार्यक्रमाजवळून गेला असता तर स्टेजवरील दाते बघून त्याला उर्दू मुशायरा सुरू असल्याचा भास झाला असता. मराठीतल्या त्या काळातल्या सर्व भावगीत गायकांपेक्षा दाते वेगळे ठरले ते यामुळेच! उर्दूतला उत्कट फील त्यांनी मराठी रसिकांना त्यांच्या भावगीतातून दिला.

उर्दूच्या बज़्ममध्ये रमलेल्या दात्यांना अक्षरश: खनपटीला बसून यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांनी मराठीच्या मैफलीत आणलं…यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा नेहमीच कृतज्ञ राहील.
- वसुंधरा काशीकर
( विशेष आभार- श्री. अतुल दाते (श्री.अरुण दाते यांचे सुपुत्र) तसेच इंदोरचे डॉ.अभय भागवत)