येवल्याची जरतारी पैठणी चक्क डाक विभागाच्या पाकिटावर!

येवला येथे पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे शुक्रवारी 17 सप्टेंबर रोजी अनावरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पैठणीचे नावही उच्चारले की, तरुणी आणि महिलांचे कान आपसुक टवकारतात. येवल्याच्या जगप्रसिद्ध राजेशाही पैठणीचा तोरा तर काही औरच. या तौऱ्यात आता अजूनच भर पडली असून येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी आता चक्क डाक विभागाच्या पाकिटावर दिसणार आहे.

पैठणी…दुकानदाराने नव्या कोऱ्या साडीचा पदर उघडून दाखवला की, कुणाचेही डोळे त्या सौंदर्याने लखाखतात. पैठणी लग्न आणि मोठमोठ्या सोहळ्यात वापरायचे वस्त्रपरिधाण. त्यामुळे तिची नजाकत, उंची आणि किंमत सारेच भारी. येवल्याच्या पैठणीने तर सातासमुद्रापार आपले नाव केलेले. या नावात आता भर पडली आहे. ही पैठणी आता चक्क डाक विभागाच्या पाकिटावर दिसणार आहे. येवला येथे पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण शुक्रवारी (17 सप्टेंबर) पैठणी विणकर व डाक विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. दोन हजार वर्ष जुना इतिहास असलेल्या पैठणीला जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे या साडीचा पदर डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर येणार आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या- ज्या गोष्टींना जीआय मानांकन प्राप्त होते, अशा सर्व गोष्टींची डाक पाकिटावर छपाई केली जाते.

नव्या ढंगात बाजारात

येवल्याची पैठणी आता नवीन ढंगात दाखल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ‘राजवस्त्राचे’ नवे रूप महिलांचे ‘सौंदर्य’ आणखीनच खुलावणार असून, नेहमीची एकाच बाजूने नेसता येणारी पैठणी आता दोन्ही बाजूने परिधान करता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या रुपातील पैठणी दोन्ही बाजूने दोन रंगाची असणार आहे. सर्वसाधारण पैठणी वा साडी ही एकाच बाजूने परिधान करता येते आणि तिचा रंगही एकच असतो. मात्र, दोन्ही बाजूने दोन रंगाची आणि दोन्ही बाजूने महिलांना परिधान करता येईल, अशी आगळीवेगळी पैठणी येथील 75 वर्षीय राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त विणकर शांतीलाल भांडगे यांनी बनविली आहे.

नव्या पैठणीची वैशिष्ट्ये

इतर पैठणीपेक्षा दीड पटीने या पैठणीचे वजन, रेशीम, विणकाम कलाकुसर हे सर्वच घटक अधिक आहे. पैठणीचे साधारणत: वजन 700 ते 800 ग्रॅमच्या आसपास असते. मात्र, ही पैठणी दीड किलो वजनाची असून पैठणीचा पदर आकुर्डी डिझाईनमध्ये बारव पंजा पद्धतीने बनवला आहे. त्यावरील डिझाइनही पेशवेकाळातील आहे. 8 महिने मेहनत घेऊन भांडगे यांनी साकारलेली ही पैठणी पाहताक्षणीच नजरेस भरते. म्हणूनच पैठणीच्या इतिहासातील हा प्रयत्न कौतुकास्पद आणि पैठणीला नवा लूक देणाराच म्हणावा लागेल. येवला शहरात आल्यानंतर अनेक प्रकारच्या नवनव्या पैठणीचे प्रकार पाहायला मिळतात, परंतु ही दुहेरी रंगाची पैठणी ही पैठणी जगतात एक नविन अविष्कार असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

हा व्हिडिओ पहाः Coal Transport | RG | मागे नंबर प्लेट नसलेला ट्रक कोळसा उधळत निघाला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!