75 वर्षीय लेखिकेची जिद्द; दुकानदाराला मराठी बोलायला भाग पाडलंच!

ज्वेलर्सच्या मालकानं मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या लेखिकेनं दुकानासमोर गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ठिय्या मांडला होता. शोभा देशपांडे यांचं वय 75 पेक्षा जास्त असून त्या अन्नपाण्यावाचून एकाच जागी बसून होत्या.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : कुलाबा येथील एका ज्वेलर्सच्या मालकानं मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या 75 वर्षीय लेखिकेनं दुकानासमोर ठिय्या मांडला होता. 20 तासांनंतर त्यांच्या या लढ्याला यश आलं. ज्वेलर्सच्या मालकानं त्यांची मराठीत माफी मागितली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यासाठी पुढाकार घेतला होता.

मराठी लेखिका शोभा देशपांडे गेल्या 20 तासांपासून या दुकानासमोर ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेनंतर प्रशासनानं त्याची दखल घेतली. सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांच्या आंदोलनाला पांठिबा दिला होता. त्यानंतर पोलिस व मनसे कार्यकर्ते ज्वेलर्सच्या मालकाला आंदोलनस्थळी घेऊन आले. दुकानदारानं शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली. मात्र, दुकानदारानं माफी मागितल्यानंतरही शोभा देशपांडे दुकानाचा परवाना दाखवावा या मागणीवर ठाम होत्या. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं.

हिंदी कशाला? मराठीत बोला!
महावीर ज्वेलर्स या दुकानातील कर्मचारी हिंदीत संवाद साधत होते. त्यानंतर ‘मराठीत बोला,’ असं शोभा देशपांडे यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला, तसंच, कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोप शोभा देशपांडे यांनी केला आहे. दुकानाचा परवाना मागितल्यावर ज्वेलर्सच्या मालकानं अरेरावीची भाषा करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं, देशपांडे यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!