Video | राजधानीत टोकाचा संघर्ष! झटापटीची भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

दिल्ली : देशभरात 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात आली. मात्र ही टॅक्टर रॅली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसक वळण लागलंय. यावेळी टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. या संपूर्ण झटापटीची थरकाप उडवणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दिल्लीत काही आंदोलक शेतकरी लाल किल्ला परिसरात दाखल झाले. यानंतर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. कारण आंदोलक दुसऱ्या मार्गाने लाल किल्ला परिसरात पोहोचले. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण मिळताच दिल्लीतील आठ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली.

शेतकरी आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळं आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरताना पाहायला मिळालंय. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन होईल, असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांचं आक्रमक रुप दिल्लीत पाहायला मिळत आहे. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लावणारे शेतकरी होती की काही समाजकंटकांनी हे आंदोलन कलुषित करण्याचा प्रयत्न केला, यावरही संशय व्यक्त केला जातो आहे.

बसचं नुकसान

दिल्लीत हिंसक झालेल्या आंदोलनावेळी बसवर हल्ला करण्यात आला. यावेळी डिटीसी बसला आंदोलकांनी लक्ष्य केलं. या बसची तोडफोडही करण्यात आली. मोठ्या संख्येनं पोलिस उपस्थित होते. मात्र आंदोलकांच्या संख्येपुढे पोलिस बळाचा काहीच निभाव लागत नसल्याचं पाहायला मिळालं. पाहा व्हिडीओ –

बॅरिकेटींग नेस्तनाभूत

पोलिस बॅरिकेटींगलाही यावेळी आंदोलकांनी जुमानलं नाही. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान रस्ता ब्लॉक करण्यासाठी घातलेले बॅरिकेट्सही यावेळी उधळवून लावण्यात आले. पाहा व्हिडीओ –

पोलिसच बॅकफूटवर

दिल्लीतील या आंदोलनावेळी आंदोलक पोलिसांवर भारी पडले. पोलिसांवरच आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना पळवून लावलंय. पाहा व्हिडीओ –

पोलिसाची सुटका

पोलिसांवरच भारी पडत असलेल्या आंदोलकांच्या या सगळ्या घटनाक्रमात एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसाला आंदोलक घेरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र त्यापैकीच काही जण पोलिसांचा सुरक्षितपणे जाण्यासाठी मार्ग काढत असल्याचं पाहायला मिळतंय. हा संपूर्ण थरारक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.

झटपट आणि प्रचंड तणाव

संपूर्ण झटापटीत पोलिस, आंदोलक आणि रिपोर्टींग करत असलेल्या प्रत्येकानं प्रचंड तणाव अनुभवला. भीतीदायक स्थिती दिल्लीत पाहायला मिळाली. यावेळी आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये तीव्र झटापट झाली. पाहा व्हिडीओ –

आंदोलन की गुंडगिरी?

एकीकडे ट्रॅक्टर रॅली काढलेल्या आंदोलकांनी दिलेला मार्ग न अवलंबता चुकीच्या मार्गाने येऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढवल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे विनंती करुनही अरेरावीपणे ट्रॅक्टर चालवून तणाव आणखी वाढवणाऱ्यांबाबतच शंका उपस्थित केली जाते आहे. कारण काहींनी ट्रॅक्टर भरधाव वेगानं पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हा सगळा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही.

बसची तोडफोड –

दिल्लीच्या पोलीस मुख्यालयाबाहेर पोलीस आणि शेतकरी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यावेळी आंदोलक शेकऱ्यांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न. काही शेतकरी इंडिया गेटच्या दिशेनं निघाले. लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केली. पाहा व्हिडीओ –

दरम्यान, शेतकरी नेत्यांनी आज सकाळी 10 वाजता नऊ ठिकाणी ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. ढांसा, चिल्ला, शाहजहांपूर , मसानी बराज, पलवल आणि सुनेढा बॉर्डरवरही ट्रॅक्टर परेड सुरु करण्याची घोषणा केली होती. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्यात आली होती.

‘हिंसा करणारे शेतकरी नव्हेत’

महत्त्वाचं म्हणजे हा सर्व झालेला प्रकार निंदनीय असल्याचं शेतकरी आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे ज्यांनी हिंसा केली, त्यांची ओळख पटली असून ते सर्व जण एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलंय. शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकरी नेत्यांनी केला असून शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांचं ट्वीट –

दिल्लीत झालेल्या हिसेंवर राहुल गांधी यांनी ट्वीट केलय. हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कोणालाही दुखापत झाली तरी नुकसान आपल्या देशाचंच होणार आहे, असंही ते म्हणालेत. त्याचप्रमाणेत देशहितासाठी कृषीविरोधी कायदे मागे घ्या, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय.

याचसंदर्भातल्या अधिक घडामोडी आणि प्रतिक्रिया आम्ही अपडेट करत आहोत. कृपया पेज रिफ्रेश करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!