व्हाइस अ‍ॅडमिरल संदीप नैथानी भारतीय नौदलाचे नवे चीफ ऑफ मॅटेरीएल

व्हाइस अ‍ॅडमिरल एसआर सरमा पीव्हीएसम 31 मे 2021 रोजी निवृत्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः व्हाइस अ‍ॅडमिरल संदीप नैथानी, एव्हीएसएम, व्हिएसएम यांनी 1 जून 2021 रोजी भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मॅटेरीएल म्हणून पदभार स्विकारला आहे. नैथानी हे पुण्यातील खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे पदवीधर आहेत.

हेही वाचाः संरक्षण मंत्र्यांनी केली ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा

भारतीय नौदलाच्या इलेक्ट्रीकल शाखेत नियुक्ती

भारतीय नौदलाच्या इलेक्ट्रीकल शाखेत त्यांची 1 जून 1985 मधे नियुक्ती झाली होती.  अ‍ॅडमिरल नैथानी हे आयआयटी दिल्लीमधून रडार आणि संप्रेषण अभियांत्रिकीचे पदव्यूत्तर स्नातक आहेत. तसंच संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय (DSSC) आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे (NDC) प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी आहेत.

हेही वाचाः सीझेडएमपीसाठी पुन्हा जनसुनावणी घ्या!

महत्त्वाच्या पदांवर काम

नौदलातील आपल्या 35 वर्षांहून अधिकच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विमानवाहू युद्धनौका विराटवरही त्यांनी महत्त्वपूर्ण सेवा बजावली आहे. मुंबई आणि विशाखापट्टणम इथल्या गोदीमधे तसंच नौदल मुख्यालयात त्यांनी ध्वज अधिकारी म्हणून कार्मिक तसंच मॅटेरीएल शाखेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. नौदलाच्या आएनएस वलसुरा या इलेक्ट्रीकलसंबंधी सर्व  प्रशिक्षण देणाऱ्या प्रतिष्ठीत आस्थापनेची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

हेही वाचाः गोवा पोलिस कॉन्स्टेबल्ससाठी निवड चाचणी ‘या’ दिवशी

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आलं आहे. भारतीय नौदलातील प्रधान कर्मचारी अधिकारी आणि सर्वात ज्येष्ठ तंत्र अधिकारी या नात्याने अ‍ॅडमिरल यांच्याकडे सर्व तांत्रिक विभागांची जबाबदारी आहे. यात देखभाल व्यवस्थापन आणि सर्व यंत्रांच्या सुविहित कार्यान्वयनाच्या जबाबदारीचा समावेश आहे. विशेषत: सगळ्या अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, शस्त्रास्त्र, सेन्सर्स, आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधित याशिवाय नौका तसंच पाणबुडीसाठी उपयोगी यंत्रणा, उपकरणे, नौदलाच्या स्वदेशीकरणा संबंधित बाबी, व्यापक तांत्रिक पायाभूत सुविधा उभारणी यासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता ते सांभाळणार आहेत.

व्हाइस अ‍ॅडमिरल एसआर सरमा पीव्हीएसम, एव्हीएसएम, व्हिएसएम 31 मे 2021 रोजी निवृत्त झाले. त्यांच्याकडून नैथानी यांनी पदभार स्विकारला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!