अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई: दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार दिलीप कुमार यांनी केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी पत्नी-अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर जलील परकार त्यांच्यावर उपचार करत आहेत.
Veteran actor Dilip Kumar has been admitted to PD Hinduja Hospital in Mumbai. He was having breathing issues since past few days, says his wife Saira Banu pic.twitter.com/eNn4hfhELL
— ANI (@ANI) June 6, 2021
मे महिन्यात केलं होतं ट्विट
याआधी मे महिन्यातही दिलीप कुमार यांना रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र दोनच दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांनी गेल्या महिन्यात ट्वीट केलं होते. “सर्वांनी काळजी घ्या, मी सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, आपण लवकरच कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळवू” अशा आशयाचं ट्वीट दिलीप कुमार यांनी केलं होतं.
हेही वाचाः दक्षिण गोवा जिल्हा कोविड हॉस्पिटलात आतापर्यंत 200 बाधित गर्भवतींवर उपचार
दिलीप कुमार यांची प्रतिकारशक्ती कमकुवत
सायरा बानो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की दिलीप कुमार यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा खूपच खालावली आहे. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे, ज्यामुळे जास्त चालू शकत नाहीत. त्यांना चालताना नेहमीच आधाराची गरज भासते.
पतीची सेवा करणाऱ्या सायरा बानो
“दिलीप कुमार माझ्या हृदयाची धडकन आहेत. त्यांना स्पर्श करणं, त्यांच्याकडे पाहत राहणं हा माझ्यासाठी जगातील सर्वोच्च आनंद आहे. तेच माझा श्वासोच्छ्वास आहेत, मी आजन्म त्यांच्याकडे पाहत राहू शकते. मी आजही त्यांची दृष्ट काढते” असं सायरा बानो यांनी मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं.

बारा दिवसात दोन भाऊ गमावले
दिलीप कुमार यांच्या दोघा धाकट्या भावांचा गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झाला. 88 वर्षीय अस्लम खान यांचं 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. तर बारा दिवसांनीच (चार सप्टेंबर) 92 वर्षांच्या एहसान खान यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी दिलीप कुमार यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं आहे.