यूपीएससी परीक्षा ठरल्या वेळेतच!

केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती. 4 ऑक्टोबर रोजी घेणार पूर्व परीक्षा.

Goan Varta Live | प्रतिनिधी

दिल्ली : यूपीएससी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, 4 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगाने न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयाने करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

परीक्षा देणार्‍या काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील अलख अलोक श्रीवास्तव यांना याचिकेची प्रत केंद्रीय लोकसेवा आयोग व केंद्र सरकार देण्यास सांगितले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!