केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) (वय 74) यांचं निधन झालंय. त्यांच्यावर हल्लीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांचे पुत्र चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी ट्विट करून ही माहिती दिली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पासवान यांचं निधन झाल्यानं लोक जनशक्ती पार्टीच्या तयारीवर याचा परिणाम होणार आहे.
गेल्या पाच दशकांपासून पासवान राजकारणात सक्रिय होते. त्यांनी बिहारसह देशाच्या राजकारणात स्वत:च्या कार्याचा ठसा उमटविला. मास लिडर म्हणून ते परिचित होते. लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून त्यांनी वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व केलं.
बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.
पासवान यांच्या निधनामुळं बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या जागावाटपांच्या समिकरणावर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तसंच अधिकाधिक जागा पक्षाला मिळाव्यात, यासाठी एनडीएसोबत त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या.