राणेंना बेडूक म्हणणारे उद्धव हे दुसरे ठाकरे!

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राणेंना म्हटलं होतं बेडूक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो : बेडूक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बेडकांची उपमा दिली. मात्र ही उपमा देणारे उद्धव हे पहिले ठाकरे नव्हेत. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना बेडकाची उपमा दिली होती. इकडे गोव्यात भाजप नेते दामू नाईक यांनी विदेशातील गोमंतकीयांना बेडूक म्हटल्यानं वादंग सुरू आहे.

राणेंच्या राजकीय धरसोड वृत्तीवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना बेडूक म्हटलं होतं.
मुंबईत 2012 साली कोकण कार्यकर्ता मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंवर कठोर शब्दांत टीका केली होती. शिवसेना सोडून राणे त्यावेळी काँग्रेसमध्ये गेले होते आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री बनले होते. त्यामुळं भडकलेल्या बाळासाहेबांनी राणेंना बेडकाची उपमा दिली होती. राणेंसारखा कोकणातला ताकदवान मोहरा गमावल्यामुळं बाळासाहेब अस्वस्थ झाले होते. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी राणेंना लक्ष्य केलं होतं.

कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राणेंचं नाव न घेता बेडूक आणि त्याची दोन पिल्लं असा उल्लेख केला. नारायण राणेंच्या शिवसेनेतून काँग्रेस प्रवेश, काँग्रेसमधून स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढणं, त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश अशा राजकीय स्थित्यंतराला बेडुकउड्या म्हणत ठाकरेंनी चिमटा काढला.

नारायण राणेंची प्रखर टीका

या टीकेमुळं भडकणार नाहीत ते नारायण राणे कसले? त्यांनीही प्रेस कॉन्फरन्स घेउन उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरेंविषयी आदर व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी कसे लायक नाहीत, याचा पाढाच त्यांनी वाचला. त्याचबरोबर सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असंही वक्तव्य राणेंनी केलं.

नितेश, नीलेश राणेंचाही घणाघात

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) व माजी खासदार नीलेश राणेही (Nilesh Rane) मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही ठाकरेंना खडेबोल सुनावत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळणार असल्याचं म्हटलंय. शिवाय आदित्य ठाकरेंवरही टीका केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!