भीषण! फूटपाथवर झोपलेल्या ‘त्यांना’ ट्रकने चिरडलं

या अपघातात 15 जणांचा मृत्यू झालाय.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

सुरतः गुजरातच्या सुरत शहरात अतिशय भीषण अपघात झाला आहे. सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना एका ट्रकने चिरडलंय. यामध्ये अपघातात 15 जणांचा मृत्यू झालाय. यापैकी 14 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका मजुराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. उर्वरित लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.

नक्की काय झालं?

गुजरातच्या सुरतमधील किम रोडच्या फूटपाथवर सोमवारी रात्री 18 जण झोपले होते. रात्री उशिरा ऊसाने भरलेला ट्रक अतिशय वेगाने आला. आणि थेट फूटपाथवर गाढ झोपलेल्या लोकांच्या अंगावर चढला. यानंतर त्या लोकांच्या जागीच मृत्यू झाला.

कोण होते हे लोक?

या अपघातातील मृत आणि जखमी लोक हे मजूर म्हणून काम करण्यासाठी सूरतमध्ये आले होते. हे लोक मूळ राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ते पोटापाण्यासाठी सूरतमध्ये मजुरीवर काम करत होते. काम करून ते रात्री फूटपाथवर गाढ झोपलेले असताना ही भयानक दुर्घटना घडली आणि या मजुरांचा दुर्दैवी अंत झाला.

अपघाताचं कारण काय?

ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करत होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केलंय

आज सकाळी गुजरातच्या सुरत शहरात झालेल्या भीषण अपघाताबद्दल ट्विट करून पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. सुरतमध्ये ट्रक अपघातात जीवितहानी झाली आहे. मी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!