मोदींमुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं भविष्य अंधकारमय!

'टाईम'ची टीका : विशेष म्हणजे मोदींच्या नावाचा सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश टाईमने केला आहे.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

न्यूयॉर्क : टाईम मॅगझीनने 2020 मधील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा समावेश आहे. मात्र, मोदींच्या नावाचा समावेश करताना टाईमने (Time) मोदींवर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं भविष्य अंधकारमय केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

पंतप्रधान मोदींचं नाव 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करताना टाईमने म्हटलं, “नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही संशयास्पद केली आहे. भारताचे आतापर्यंतचे जवळपास सर्व पंतप्रधान देशातील बहुसंख्याक 80 टक्के हिंदू समाजातून आले आहेत. मात्र, केवळ मोदींनीच इतरांनी कधीही चालवलं नाही असं सरकार चालवलं.”
“नरेंद्र मोदी सर्वांच्या सशक्तीकरणाचं लोकप्रिय आश्वासन देत पहिल्यांदा निवडून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा पक्ष भाजपने केवळ उच्च वर्गालाच नाकारलं नाही, तर मुस्लिमांना लक्ष्य करत विविधतेलाही नाकारलं. त्यांनी साथीच्या रोगाचं कारण सांगत विरोधीमत व्यक्त करणाऱ्यांना दडपलं आणि जगातील सर्वात जीवंत लोकशाही काळोखात गेली,” असंही टाईमने नमूद केलं आहे.
पंतप्रधान मोदींसोबत चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत तैवानचे राष्ट्रपती त्सई इंग-वेन याचंही नाव आहे. या यादीत अनेक भारतीय किंवा भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. यात गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, (Sundar Pichai) अभिनेता आयुष्मान खुराना, (Ayushman Khurana) एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंद्र गुप्ता, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याही नावाचा समावेश आहे. इतकंच नाही तर भारतातील नागरिकत्व कायद्याला (एनआरसी-सीएए) विरोध करत शाहीन बाग प्रदर्शनात सहभागी झालेल्या बिल्‍किस बानो या आजींचाही सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅगझीनने 2019 मध्ये देखील पंतप्रधान मोदींना या यादीत जागा दिली होती. टाईम मॅगझीनकडून अनेकदा मोदींवर वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात आली आहेत. याआधी एकदा टाईमने आपल्या एका लेखात पंतप्रधान मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ असा उल्लेख केला होता. यानंतर मात्र दुसऱ्या लेखात मोदी सर्वांना जोडणारे दशकांनंतर मिळणारे नेते असल्याचं म्हटलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!