भेकुर्ली, आंबोली येथे पट्टेरी वाघाचे दर्शन

जंगलात वनविभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत वाघ कैद

Goan Varta Live | प्रतिनिधी

तिलारी: दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्लीच्या जंगलात वनविभागाच्यावतीने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीत शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक पट्टेरी वाघ कैद झाला. हा वाघ मानव वस्तीपासून अत्यंत दूर अशा जंगलात कैद झाला आहे. त्यामुळे दोडामार्गात पट्टेरी वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भेकुर्सीत म्हशीवर वाघाचा हल्ला

दरम्यान, भेकुर्ली येथून कुंभवडे येथे कच्च्या रस्त्यावरून शुक्रवारी सकाळी कामाला जाणाऱ्या महिलांना वाघाचे दर्शन झाले. वाघ समोर दिसताच त्यांचा भीतीने थरकाप उडाला. ही घटना ताजी असतानाच भेकुर्ली धनगरवाडीतील शेतकरी नाना मया पाटील यांच्या गोठ्यातील म्हशीवर वाघ हल्ला करणार त्याच दरम्यान त्यांचा पाळीव कुत्रा भुंकत पुढे गेल्याने वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा सुदैवाने बचावला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत प्रभारी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, दोडामार्ग तालुक्यात पट्टेरी वाघ सीसीटीव्हीत कैद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तो वाघ कोणत्या परिसरात दिसला, याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली. गेले काही दिवस भेकुर्ली परिसरात हिंस्र पशू व वाघाचा मुक्तसंचार असल्याने तेथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

आंबोली हिरण्यकेशीत वाघाने म्हशीचा फडशा पाडला

आंबोली हिरण्यकेशी येथील आंब्याची व्हाळ येथे घराजवळ गणपत कानू राऊत यांच्या मालकीच्या म्हशीवर पट्टेरी वाघाने हल्ला करीत शुक्रवारी पहाटे फडशा पाडला. आंबोली पट्ट्यात राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आहे हे या आधी देखील सिद्ध झाले होते. गेल्या वर्षी राऊत यांची गाय वाघाने शिकार करून ठार केली होती. यावेळी वाघ गायीला मारून खात असतानाचा फोटोदेखील व्हायरल झाला होता. वनविभागाने जंगलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा वाघ निदर्शनास आला होता. आंबोली हिरण्यकेशी परिसरात अनेकवेळा पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला करून ते मारून खाल्ले आहेत. वनविभागाने सातत्याने या घटनेचे पंचनामे देखील केले. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची भरीव भरपाई वनविभागाने दिलेली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!