छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील तीन चित्रे प्रकाशात

दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील लघुचित्रे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७ व्या शतकातील असून ती लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग) स्वरूपात आहेत. भारतामध्ये आलेल्या तत्कालीन युरोपीयन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ही लघुचित्रे युरोपमध्ये हस्तांतरित झाली. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथे ही चित्रे सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहेत.

हेही वाचाः स्वतंत्र कायद्यानंतरही सामाजिक बहिष्काराचे 6 वर्षात 104 गुन्हे

शिवकाळात भारतामध्ये अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतूबशाहीची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील चित्रशैलीला दख्खनी गोवळकोंडा चित्रशैली संबोधिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढली गेली आहेत. किंवा त्यावेळी चितारल्या गेलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने ही चित्रे काढली गेली असावीत. ही तीनही चित्रे जलरंगातील असून सोन्याने रंगविली आहेत. या चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत, अशी माहिती प्रसाद तारे यांनी दिलीये.

हेही वाचाः गवंडाळीत रेल्वे ओव्हरब्रीज पाहिजेच; लोकांची आग्रही मागणी

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दाखविण्यात आली आहे. फ्रान्समधील पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र दाखविले आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार त्यांच्या डाव्या हातामध्ये मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचे शोभेचे पीस दाखविण्यात आलं आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील संग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार दाखविली आहे. पॅरिस आणि फिलाडेल्फिया येथील चित्रांमध्ये पर्शियन आणि रोमन लिपीमध्ये शिवाजी महाराजांचे नाव लिहिलेलं आहे, असं तारे यांनी सांगितलं.

हेही वाचाः आमदाराने फक्त स्वतःचा विकास केला

मराठी माणसांसाठी अभिमानास्पद

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात २७ चित्रे प्रसिद्ध आहेत. या तीन अप्रकाशित चित्रांची भर पडण्यासाठी तारे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. परदेशात असलेली ही चित्रे मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहेत, असं पांडुरंग बलकवडे यांनी सांगितलं. मुंबई येथील छत्रपती शिवाजी संग्रहालय येथील चित्रांशी ही मिळतीजुळती चित्रे आहेत, असं निरीक्षण त्यांनी नोंदविलं.

हेही वाचाः मोरजीत ९० वर्षीय महिलेले घेतली कोरोना लस

या लघुचित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार आणि पायामध्ये मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात मोत्यांच्या दोन माळा असे मोजकेच अलंकार परिधान केले असल्याचं दिसून येतं. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन वर्णनामध्ये आढळणारी वैशिष्ट्ये या चित्रांमध्येही दिसतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!