महाभयंकर! सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण

देशभरात 24 तासांत 3 लाख 46 हजार 786 रुग्णांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : डबल म्युटेशनसह कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनलीय. देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 46 हजार 786 रुग्णांची नोंद झालीय. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक आहे. सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णावाढीबरोबरच देशात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. देशात 24 तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांनी प्राण गमावले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून देशात होत असलेली रुग्णवाढ शनिवारी नव्या पातळीवर पोहोचली. एका दिवसांत आढळून आलेल्या जागतिक रुग्णवाढीचा विक्रम मोडीत निघाल्यानंतर सलग दुसर्‍या दिवशी देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून ही माहिती सगळ्यांनाच काळजीत टाकणारी आहे.

2 लाख 19 हजार 838 जणांची कोरोनावर मात

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 46 हजार 786 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात 2 हजार 624 जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात 24 तासांच्या काळातच 2 लाख 19 हजार 838 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 89 हजार 544 जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या 25 लाख 52 हजार 940 रुग्ण उपचार घेत आहेत.

मास्क न वापरणं धोकादायक

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्युशनने केलेल्या अभ्यासात मास्कच्या वापराबद्दलही चिंता व्यक्त केलीय. सप्टेंबर 2020च्या मध्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधीपर्यंत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घसरण होत होती. एप्रिलमध्ये अचानक यात वाढ झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुपटीने कोरोना रुग्णवाढ झाल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णसंख्या 71 टक्क्यांनी वाढली आणि दररोज होणारे मृत्यू 55 टक्क्यांनी वाढले. कोरोना नियमावलीचं पालन न करणं, सोहळ्यांना गर्दी करणं आणि मास्क वापरण्यास टाळाटाळ ही या मागची कारणं आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!