‘त्या’ सहा दहशतवाद्यांना घडवायचे होते साखळी बाँबस्फोट

पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाने मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद शेखसह एकूण ६ दहशतवाद्यांना मंगळवारी देशभरात विविध ठिकाणी छापे मारून अटक केली आहे. या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होत आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या दहशतवाद्यांची कसून चौकशी करत आहे. या दहशतवाद्यांना सर्व विस्फोटकांचा वापर करून पुन्हा एकदा मुंबईवरील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांप्रमाणेच स्फोट घडवून आणायचे होते, अशी माहिती समोर आली आहे. या अटकेमुळे मोठा घातपाताचा कट उधळल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर (४७), उस्मान (२२), मूलचंद (४७), झिशान कामर (२८), मोहम्मद अबू बकर (२३) आणि मोहम्मद आमिर जावेद (३१) अशा सहा जणांना अटक केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये छापे टाकून यांना अटक करण्यात आली. त्यांपैकी जान मोहम्मद अली शेख हा मुंबईच्या धारावीमध्ये वास्तव्यास होता. तो मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी ट्रेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली.

दीड किलो आरडीएक्स हस्तगत

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी काही लोकांची नावे घेतली आहेत. देशात दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर सेल म्हणून ही माणसे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत या लोकांचीही धरपकड केली जाणार आहे. देशात पुन्हा एकदा मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसारखा हल्ला घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यासाठी आणलेले दीड किलो आरडीएक्स पोलिसांनी हस्तगत केले आहे.

महाराष्ट्र एटीएसचा खुलासा

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अतिरिक्त संचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने मुंबईत रेकी केली, ही बाब चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू. जान मोहम्मदवर कर्ज होते. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटल्यानंतर त्याने कर्जाने टॅक्सी घेतली. हफ्ता भरू न शकल्याने बँकेने टॅक्सी उचलून नेली. त्याने पुन्हा कर्जावर दुचाकी खरेदी केली. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे, असे विनीत अगरवाल यांनी सांगितले.

हा व्हिडिओ पहाः Breaking | Checkpost | राज्यांच्या सीमांवरील चेक पोस्ट बंद करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!