कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस

आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा; मुख्य वैद्यकीय अधिकारी शामली संजय अगरवाल यांच्याकडे कारवाईची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

लखनौ: देशात लसीकरण मोहीम सुरू असताना आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आलीये. तीन वयस्कर महिलांना करोनाऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा प्रकार घडलाय. लस दिल्यानंतर एका महिलेचा प्रकृती प्रचंड बिघडलीये. यानंतर तिच्या नातेवाईकांना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडे यासंबंधी तक्रार केली असता ही घटना उघडकीस आलीये. उत्तर प्रदेशात ही घटना घडलीये. केंद्र आणि राज्य सरकार वारंवार पात्र लोकांना लस घेण्याचं आवाहन करतंय. एकीकडे लसीकरणासाठी केंद्रांबाहेर लोक रांगा लावत असताना उत्तर प्रदेशातील या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा

शामली येथील आरोग्य केंद्रात सरोज (७०), अनारकली (७२) आणि सत्यवती (६०) या लसीकरणासाठी पोहोचल्या होत्या. करोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी त्या पोहोचल्या असता तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरुन प्रत्येकी १० रुपयांचं इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितलं. यानंतर त्यांना करोनाऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आली. तिन्ही महिला अशिक्षित आहेत. लस घेतल्यानंतर त्या घरी पोहोचल्या. यावेळी एका महिलेची प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी महिलेला खासगी डॉक्टरकडे नेलं असता आरोग्य केंद्राने लस दिल्यानंतर दिलेलं प्रिस्क्रिप्शन पाहून त्यांना धक्का बसला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना महिलेला रेबीजची लस दिली असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. महिलांच्या नातेवाईकांनी यासंबंधी अधिक चौकशी केली असता आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा समोर आला. यानंतर नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घातला आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी शामली संजय अगरवाल यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!