कुत्र्यांच्या २५० पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : कुत्र्यांना नुसते पाहताच माकडे धूम ठोकतात. मात्र, आता माकडेच कुत्र्यांच्या जीवावर उठली आहेत. हा प्रकार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगावात सुरू आहे. या गावात कुत्रा विरुद्ध माकड यांच्या युद्धात माकडाच्या टोळीने आतापर्यंत जिल्ह्यातील २५० कुत्र्यांच्या पिलांना ठार मारले आहे.
जिल्ह्यांतील २५० कुत्र्यांना मारले ठार
बीडमधील माजलगावातील लवूळ भागात कुत्र्यांच्या टोळीने काही दिवसांपूर्वी लहान माकडाचा बळी घेतला होता. यामुळे संतप्त झालेल्या माकडांच्या गटाने जिल्ह्यांतील २५० कुत्र्यांना ठार मारले. यामुळे कुत्री आणि माकडे यांच्यात अक्षरशः युद्ध पेटल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात ती माकडे कुत्र्याच्या पिल्लांना इमारती आणि झाडांवर फेकून देत होती.
वन अधिकाऱ्यांना माकडांच्या टोळीला पकडण्यात यश मिळालेले नाही
जवळजवळ २५० कुत्री मारल्यानंतर, गावातून प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांवर माकडांनी हल्ले करण्यास सुरुवात केली. यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आता ही माकडे लहान मुलांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे गावकऱ्यांनी शेवटी वन अधिकाऱ्यांना पाचारण केले. पण, आश्चर्य म्हणजे ते एकही माकड पकडू शकले नाहीत.त्यांनी सापळा रचला तरी माकडांच्या टोळीला पकडण्यात यश मिळालेले नाही.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, माकडाच्या एका पिल्लास कुत्र्यांनी हल्ला करून ठार केल्यापासून माकडे कुत्र्यांची पिल्ले मारत आहेत. कुत्री आणि माकडांमधील ही बदल्याची आग कधी शमणार, कधी मोकळा श्वास घेता येणार, याचीच वाट आता सर्वांना आहे.