मानवी सत्तांध, भयावह, भेसूर प्रवृत्तीवर प्रभावी भाष्य करणारं ‘द फाॅक्स’

सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे बुधवार १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. नाट्यपुस्तकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एका युवकाने आपल्या संघर्षमय जीवनातूनच प्रेरणा घेऊन इंग्रजीतून “द फाॅक्स” हे नाटक लिहिलं आहे. या पोस्ट माॅडर्न थिएट्रीक्स प्रकारातील नाटकाचे संपादन व प्रकाशन दिल्ली येथील मॅचवर्ड प्रेसने हल्लीच काही दिवसांपूर्वी केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या होतकरू प्रतिभावंत नाटककाराचा एक कौतुक सोहळा तसंच या नाट्यपुस्तकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे बुधवार १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेला आहे.

ब्रिटिश लेखक कवी आणि सामाजिक कार्यकर्त्याने घेतली नाटकाची दखल

या नाटकाची दखल नामवंत विद्रोही ब्रिटिश लेखक कवी आणि सामाजिक कार्यकर्ते बेंजामिन झेपानिया यांनी घेतली, एवढंच नव्हे तर अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध “ब्राॅड वे” या नावाजलेल्या थिएटर रिसर्च सेंटरमध्ये त्याचं वाचनदेखील झालं आहे. पुढील काळात या नाटकाचे प्रयोग ब्राॅड वे मध्ये होणार आहेत. अमेरिकेतील नावाजलेल्या येल युनिव्हर्सिटीतील थिएटर रिसर्च विंगने नवोदित नाटककारांच्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी “द फाॅक्स” या नाटकाला स्वीकारले आहे.

नाटकाच्या लेखकाबद्दल…

कोकणाच्या या मातीत प्रतिभेचा झरा कुठून कसा वाहतो हे नक्की सांगता येणार नाही हेच खरं… सरमळे सारख्या निसर्गरम्य पण एका दुर्लक्षित गावातील दलित कुटुंबात जन्मलेला अनिल कांबळे सरमळकर हा सर्व प्राप्त परिस्थितीवर मात करत सावंतवाडी, वेंगुर्ले येथून बीए करतो काय आणि कणकवलीमधून इंग्रजी विषयात एमए करतो काय… बरं एवढं करून थांबत नाही तर वैयक्तिक अनेक कटू अनुभवांंवर मात करून एक काव्यात्मक साहित्यिक दृष्टिकोन जोपासतो काय…हे सगळंच फार अजब आहे. कौतूकास्पद आहे.

त्याने गेल्या दहा बारा वर्षांत अनेक कथा, कादंबऱ्या तर लिहिल्याच, तसाच एखाद दुसरा चित्रपटही लिहिला. पण त्याच बरोबर मानवी सत्तांध, भयावह आणि भेसूर प्रवृत्तीवर प्रभावी भाष्य करणारं एक इंग्रजी नाटक लिहिलं तेच हे “द फाॅक्स.”

सिंधुरत्न फाउंडेशनतर्फे आयोजित 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!