करसवलती की करभार? अर्थसंकल्प 2021 थोड्याच वेळात LIVE

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड महामारीनंतर सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा अंतरिमसह नववा अर्थसंकल्प असून, रोजगार संधी निर्माण करण्यासाठी अधिक गुंतवणूक आणि ग्रामीण विकास तसंच विकासात्मक योजनांसाठी भरीव तरतूद केली जाईल, त्याचबरोबर करदात्याच्या हातांत अधिक पैसा असेल याची तरतूद केली जाईल, त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नियम अधिक सुटसुटीत करण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी कधीही नव्हता असा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी लोकसभेत सादर करणार असलेला अर्थसंकल्प हा सध्याच्या महामारीने ग्रस्त लोकांना दिलासा देणारा असेल, तसेच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांशी निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन संरक्षण खर्चावर अधिक भर देणारा असेल, अशी अपेक्षा शुक्रवारी सादर झालेल्या आर्थिक आढाव्यानंतर व्यक्त केली जात आहे. यापूर्वी कधीही नव्हता असा अर्थसंकल्प मांडला जाईल, असं सीतारामन यांनी अलीकडेच म्हटल्यानं त्याविषयी उत्सुकता वाढली आहे.
अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्याचं आव्हान
यंदाचा अर्थसंकल्प हा कोविड-१९ मुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्याचा पहिला प्रयत्न असेल, असं अर्थतज्ज्ञांना वाटत आहे. वहीखाता या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यानं नव्या बाटलीत जुन्या योजना नसतील असं मानलं जातं. जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने रूळावर आणण्यासाठी स्पष्ट आराखडा सादर करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. वेळोवेळी छोट्या दुरुस्त्या करून सवलती जाहीर करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी अर्थमंत्र्यांना घ्यावी लागणार आहे.
पुरक अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा
सकल घरेलू उत्पन्नाची वार्षिक गती नव्या आर्थिक वर्षात ७-८ टक्क्यांनी घसरेल याबाबत अर्थतज्ज्ञांमध्ये दुमत नाही. मंदावलेला करोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणाला आलेला वेग यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण तयार होत असल्याचं चित्र दिसत असून, याला पुरक असा अर्थसंकल्प सादर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी मध्यंतरी आत्मनिर्भर भारत योजनेखाली सरकारने काही योजना कार्यान्वित केल्या होत्या. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
#Budget2021 | अर्थसंकल्पाच्या महत्त्वाच्या अपडेट्स LIVE
अपेक्षारूपी चार सूत्री
सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांना चालना द्यावी लागेल, औद्योगिक आणि कृषी, सेवा क्षेत्रांत मोठ्या आणि लघु उद्योगांमध्ये सुलभता आणावी लागेल, कर महसुलाला धक्का लागू न देता खासगी वापरावर सवलत द्यावी लागेल, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर अधिक खर्च करावा लागेल, अशी चार सूत्री ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण सिंग यांनी सुचविली आहेत.