कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट करा – विनायक राऊत

राज्यात 24 तासांत 49 हजार नवे रुग्ण; लसीकरणाचा वेग वाढवण्याची केंद्राकडे मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलीये. लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा मूर्खपणा करणाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनीच शहाणपणा शिकवावा, असा टोलाही राऊतांनी लगावला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललीये. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावं. सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. तेव्हाच कोरोना रोखता येईल. तसंच या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक करावं. यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलीये.

प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक

मुंबईसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याची गरज आहे. त्यामुळे परदेशातून येणारी विमान सेवा बंद करावी. तसंच दिल्ली, मुंबईत रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे बेफिकिरपणे चाकरमान्यांनी कोकणात जाणं धोकादायक आहे. याचा त्रास तिथल्या आरोग्य यंत्रणांवर पडेल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रत्येकांची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असावं. त्याशिवाय लसीकरण गरजेचं करावं. लसीकरणाशिवाय गावात प्रवेश देऊ नये. यासाठी विशेष मोहिम राबवली पाहिजे, असंही विनायक राऊत म्हणाले.

अधिकाधिक लस द्या, केंद्राकडे मागणी

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार निर्णय घेईल ही अपेक्षा आहे. काहीजण बकवासगिरी करतायत. तोंड दिलंय त्याचा दुरुपयोग करायचा. यामुळे कोरोना वाढला आहे. लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा मूर्खपणा करणाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनीच शहाणपणा शिकवावा, असा टोलाही राऊतांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय की मास्क घाला, पण तरीही काही नेते ते करत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छान काम करतायत. लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली असल्याचं विनायक राऊत म्हणाले.

राज्यात 24 तासांत 49 हजार नवे रुग्ण

दरम्यान, राज्यात 3 एप्रिलला एका दिवसात कोरोनाचे तब्बल 49447 नवे रुग्ण आढळलेत. तसंच तीन एप्रिलला दिवसभरात तब्बल 277 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून 3 एप्रिलला दिवसभरात प्रथमच कोरोना रुग्ण 50 हजाराच्या जवळपास गेलेत. या आकडेवारीमुळे राज्य सरकार तसंच आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली असून लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून विचार केला जातोय. राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या शहरात कोरोनानं अक्षरशः कहर केलाय. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीये. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढलीये. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!