कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने केला ब्रश

मुंबईतील मुलीने तडफडून सोडला प्राण

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: मुंबईतील धारावी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका मुलीनं कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने आपले दात घासले आहेत. पण काही सेकंदातच पेस्टची चव वेगळी लागल्यानं मुलीनं तोंडातील पेस्ट थुंकली आणि तोंड धुतलं. पण काही सेकंदातच उंदीर मरण्याचं औषध शरीरात पसरल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही संशयास्पद आढळल्यास या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी घडली घटना

अप्साना खान असं मृत पावलेल्या 18 वर्षीय मुलीच नाव आहे. संबंधित घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर अप्सानानं अनावधानानं कोलगेट समजून उंदरी मारण्याच्या औषधानं आपले दात घासले होते. पण पेस्टची चव वेगळी लागल्यानं तिने तोंडातील सर्व पेस्ट खाली थुंकली. पण तेवढ्याच वेळात विष तिच्या शरीरात पसरलं होतं. सुरुवातीला तिला फार त्रास झाला नाही. पण त्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. यानंतर पोटदुखीवरील औषध तिला देण्यात आलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

म्हणून मुलीने उंदीर मारण्याच्या पेस्टनं ब्रश केल्याची बाब लपवली

आई ओरडेल म्हणून मुलीनं उंदीर मारण्याच्या पेस्टनं ब्रश केल्याची बाब लपवली होती. पण वेदना वाढत गेल्यानंतर तिने आपल्या आईला खरं कारण सांगितलं. त्यानंतर आईनं तिला त्वरित सायन रुग्णालयात दाखल करत ECG आणि सोनोग्राफी केली. त्यानंतर मुलीला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी दोन दिवस उपचार केल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी मुलीनं अखेरचा श्वास घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच वडिलांचं निधन

संबंधित मृत मुलगी मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी असून याठिकाणी ती आपली आई, एक मोठी बहिणी आणि दोन भावांसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडिओ पहाः COVID-19 | बाजारात गर्दी होऊनही रुग्णसंख्येत घट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!