तरुण तेजपालची ट्रायल लांबणार

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले पत्रकार तरुण तेजपाल याच्याविरोधात गोवा पोलिसांनी बुधवारी अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले. पहिलं आरोपपत्र सहा वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2014 मध्ये दाखल केल्यानंतर आता सात वर्षांनी अतिरीक्त आरोपपत्रं दाखल करणं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत संशयिताला अडकवून ठेवण्याचाच डाव आहे, असं तरुण तेजपाल यांचे वकील राजीव गोम्स यांनी म्हटलंय.
तेहलका साप्ताहिकाचे मुख्य संपादक असलेले तरुण तेजपाल यांच्याविरोधात त्यांच्याच एका महिला सहकाऱ्याने लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार दाखल केली होती. यावरून त्यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. सध्या ते 1 जुलै 2014 पासून जामिनावर आहेत. गोव्यात एका कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली होती. मुळ आरोपपत्र 3 हजार पानांच आहे आणि आता त्यात अतिरिक्त आरोपपत्राची भर पडलीय.
सध्या तरुण तेजपाल यांची ट्रायल सुरू आहे. ही ट्रायल अंतिम टप्प्यात पोहचली असता आणि तिथे पोलिसांच्या हाती काहीच ठोस मिळत नसताना अचानक हे अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 65 पेक्षा अधिक जणांची साक्ष नोंदवण्यात आलीय. आता केवळ तपास अधिकाऱ्यांची जबानी तेवढी बाकी राहिली आहे, असेही अॅड. गोम्स यांनी म्हटलंय.
म्हापसा येथील कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2020 पर्यंत ट्रायल प्रक्रिया पूर्ण करा, असे न्यायालयाला सांगितले होते. तदनंतर सरकारी वकिलांनी अतिरिक्त वेळ मागून घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2021 पर्यंत ट्रायल पूर्ण करा, असे बजावले आहे. तपास अधिकाऱ्यांनी कुठेच नव्यानं चौकशी सुरू केल्याचा उल्लेख कनिष्ठ वा सर्वोच्च न्यायालयात अद्यापही केलेला नाही. न्यायालयात तपासाची बाजू कोलमडू लागल्याचे दिसून आल्यामुळेच ही शक्कल लढवली जात आहे, असा आरोप अॅड. गोम्स यांनी केलाय.