पीडिता, साक्षीदारांवर दोन आठवडे कारवाई नको

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल (Tanun Tejpal) याच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यातील पीडित युवती तसेच इतर साक्षीदार न्यायालयात उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्या विरोधात पुढील दोन आठवडे कोणतीच सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हापसा सत्र न्यायालयाला दिला आहे. दरम्यान या प्रकरणी तेजपाल यास बाजू मांडण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत खंडपीठाने मुदत दिली आहे.
तेजपालविरोधातील बलात्काराचा खटला डिसेंबर 2020 पर्यंत संपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानुसार म्हापसा सत्र न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी सुरू केली होती. याअंतर्गत सत्र न्यायालयाने पीडित युवतीची जबानी मार्च 2020 पासून सुरू केली होती. त्यानंतर तिची उलटतपासणी होणार होती. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात लाॅकडाऊन लागू केल्याने तिला न्यायालयात उपस्थित राहता आले नाही. याची दखल घेऊन न्यायालयाने पीडितेला वाॅरन्ट जारी केले होते. या प्रकारानंतर 9 सप्टेंबर रोजी पीडित युवतीने खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. शिवाय इतर साक्षीदारांना लाॅकडाऊनमुळे न्यायालयात उपस्थित राहता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधातही कारवाईची शक्यता लक्षात घेऊन गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.
या सुनावणीवेळी खटला लवकर निकालात काढण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती याचिकादारांनी खंडपीठाला दिली. या सर्व माहितीची दखल घेऊन खंडपीठाने वरील निर्देश जारी केले आहे.