तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’

सुशांत सिंह राजपूतचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पहाच

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजेच 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हिंदी सिनेमाच्या एका उगवत्या तार्‍याने या जगाचा निरोप घेतला, यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता. सुशांतने आपल्या छोट्या कारकीर्दीत बर्‍याच मोठ्या चित्रपटांत काम केलं, यामुळे तो नेहमी चाहत्यांमध्ये जिवंत राहील.

टीव्ही कार्यक्रम ‘किस देश में है मेरा दिल’मधील हर्षद चोप्राच्या भावाच्या भूमिकेत दिसलेल्या सुशांत सिंहला त्याची खरी ओळख ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. पण, जेव्हा अभिनेत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने पुन्हा चाहत्यांना वेड लावलं. आज आम्ही तुम्हाला सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिनेत्याच्या पाच चित्रपटांचा परिचय करून देणार आहोत, जे चाहते कधीही विसरू शकत नाहीत…

एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी

‘एमएस धोनी… द अनटोल्ड स्टोरी’ हा सुशांतच्या कारकीर्दीतील सर्वात नेत्रदीपक चित्रपट होता. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. धोनीसारखे दिसण्यासाठी सुशांतने खऱ्या आयुष्यात क्रिकेटरचा लूक स्वीकारला. यासह, अभिनेत्याने क्रिकेटचे प्रशिक्षण देखील घेतले होते आणि अभिनेताने धोनीच्या हेलिकॉप्टर शॉर्टसाठी दिवसरात्र काम केलं होतं. हेच कारण होतं की, जेव्हा चाहत्यांनी सुशांतला पडद्यावर पाहिलं, तेव्हा त्यांना त्याला ओळखताच आलं नाही.

राबता

‘राबता’ चित्रपटात जेव्हा सुशांत कृती सॅनॉनसोबत दिसला, तेव्हा चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली. हा चित्रपट पुनर्जन्म आणि कधीही न संपणार्‍या प्रेमाची कहाणी होता. सुशांत आणि कृतीच्या चाहत्यांना शिव आणि सायरा खूप आवडले. या चित्रपटातही सुशांत दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. सुशांतच्या लूक आणि चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटाने सुशांतने सर्वांनाच चकित केलं. या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात सुशांतच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. सुशांतने चित्रपटामध्ये बरेच गेटअप्स घेतले होते. या चित्रपटाच्या पुढच्या भागावर चर्चा सुरू होती, पण आता सुशांतच्या निघून गेल्यानंतर ही गोष्ट इथेच संपली आहे.

सोनचिडीया

सोनचिडिया या चित्रपटाने पडद्यावर फारशी कमाई केली नाही. परंतु, डाकू बनलेल्या सुशांतने चाहत्यांची मनं निश्चितपणे जिंकली. मनोज बाजपेयी, भूमि पेडणेकर, रणबीर शोरे या कलाकारांसमवेत सुशांतने आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. पहिल्यांदाच सुशांतने अशा भूमिकेत चाहत्यांची भेट घेतली होती. सुशांतनेही या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेतले होते.

छिछोरे

२०१९ सालामध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा स्टारर फिल्म ‘छिछोरे’ चित्रपट चाहते कधीही विसरणार नाहीत. हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटातही सुशांतने त्याच्या लूकवर प्रयोगही केले होते. या चित्रपटात सुशांत एका वयस्क व्यक्तीच्या भूमिकेतसुद्धा दिसला होता.

दिल बेचारा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रदर्शित झालेला ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. सकारात्मकता पसरवणाऱ्या मॅनी या तरुणाची भूमिका त्याने या सिनेमात साकारली होती. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट सुशांतच्या आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरला. मात्र हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर कोरला जावा असा अभिनय सुशांतने यात केल्याचं पाहायला मिळालं.

याशिवाय ‘केदारनाथ,’ ‘काय पो छे!,’ ‘शुद्ध देसी रोमान्स’ हे सुशांतच्या कारकीर्दीतील खूप चांगले चित्रपट होते.

हा व्हिडिओ पहाः

सुशांत सिंह राजपूतच्या अनेक फॅन्सनी त्याची आठवण काढताना विविध माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!