कोरोना काळात जे भारताने केलं, ते अन्य कुणीही करु शकला नाही

सर्वोच्च न्यायालयाने केलं मोदी सरकारचं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही कायम आहे. मात्र, अशातच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, ऑक्टोबर महिन्यात ती धडकू शकते, असे म्हटले जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार तयारीला लागले आहे. एकीकडे कोरोना संदर्भातील याचिकांसंदर्भात देशातील अनेकविध न्यायालयांनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले असताना, सर्वोच्च न्यायालयाने मात्र कौतुक केले आहे. कोरोना संकटाच्या काळात भारत सरकारने जे काम केले, ते अन्य कोणताही देश करू शकलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत भारताने जे काही केले आहे, ते अन्य कुठलाही देश करू शकलेला नाही, याची न्यायिक नोंद घेणे आपल्याला आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले.

याचा आम्हाला आनंद आहे

अनेक कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी काही तरी करण्यात आले, याचा आम्हाला आनंद आहे. ज्या लोकांना भोगावे लागले त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे अश्रू पुसले जातील. लोकसंख्या आणि प्रमाणाबाहेरची लोकसंख्या यांच्या अनेक समस्या असूनही काही तरी करण्यात आले, याची आम्ही नोंद घ्यायलाच हवी. भारताने जे काही केले आहे, ते इतर कुठलाही देश करू शकलेला नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले.

देश जे काही करू शकतो, ते करण्यात येत आहे

गेलेले जीव आम्ही परत आणू शकत नाही, मात्र ज्यांना भोगावे लागले आहे अशा कुटुंबांसाठी देश जे काही करू शकतो, ते करण्यात येत आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. निर्देशांसह ४ ऑक्टोबरला आदेश जारी करू, असे केंद्र सरकारने सादर केलेल्या दोन शपथपत्रांची नोंद घेणाऱ्या न्या. एम.आर. शहा व न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले. तसेच मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास, मृताचा हॉस्पिटल रेकॉर्ड मागवण्याचा अधिकार जिल्हा स्तरावरील तंटा निवारण समित्यांना दिला जाईल, असेही यावेळी न्यायालयाला सांगण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!