सिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला !

मुख्य सुत्रधार फैजल उर्फ बाॅबी बेग फरार

उत्तम शिरोडकर | प्रतिनिधी

कुडाळ : आकेरी घाटी येथे गांजा प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी येथे कुडाळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ९८ हजार रुपयांचा ३ किलो २७८ ग्रँम गांजा पकडला. या प्रकरणी पकडण्यात आलेल्या संशयिताला गांजा दिलेल्या अतूल उमेश गवस (२३ रा. खासकिलवाडा सावंतवाडी ) याला सावंतवाडीतून ताब्यात घेण्यात आले. तर गवस या युवकाला गांजा पुरवणारा मुख्य सुत्रधार हा फैजल उर्फ बाॅबी बेग रा. माठेवाडा मालदार मार्ग असून तो फरार असल्याची माहीती कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दिली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ए. ए. देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी आकेरी वेंगुर्ला रस्त्यावर सापळा रचण्यात आला. सायंकाळी ६ वाजल्यानंतर संशयित मयुरेश गुरुनाथ कांडरकर व आशिष अशोक कुलकर्णी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ३६७ ग्रॅम सुमारे ११ हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला होता. यानंतर त्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक सागर शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत शिंदे यांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरिक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांचे सहकारी स्वप्निल तांबे व रुपेश सारंग यांच्या पथकाने सावंतवाडी येथे धाड टाकली. मध्यरात्री ३ वा. कांडरकर याला गांजा देणारा अतुल गवस याला ताब्यात घेतले व त्याला सावंतवाडी ठाण्यात नेले.

सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने अधिक माहीती घेतल्यावर यातील मुख्य सुत्रधार फैजल उर्फ बाॅबी बेग रा. माठेवाडा मालदारमार्ग हा असल्याचे समोर आले. यानुसार बाँबी बेग याच्या घरावर छापा टाकला मात्र बॉबी बेग फरार झाला. मात्र बेग याच्या जुनाट घरातून बाथरूमच्या माडीवर ठेवलेला ३ किलो २७८ ग्रँम वजनाचा सुमारे ९८ हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपी अतुल गवस याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.

यामध्ये अजून काही जण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यातील चौथा व मुख्य सुत्रधार असलेला संशयीताला पकडल्यावरच पुढील माहीती मिळण्याची शक्यता आहे. यानंतर जिल्ह्यात पसरलेल्या गांजा विक्री जाळ्याचा पर्दापाश होण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!