अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, निधनाचे वृत्त निव्वळ ‘अफवा’…

कुटुंबियांची माहिती; अफवांवर विश्वास ठेवू नये

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध नाट्य-चित्र अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिली आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

राजेश दामले पुढे म्हणाले, “विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये”. असे त्यांनी सांगितले.

निधनाचे वृत्त फेटाळले

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मिडीयावर पसरत आहेत. त्यांच्या पत्नी वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम यांच्या निधनाचे वृत्त फेटाळले. त्यांच्या मुलीनेही अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.

विक्रम गोखले गंभीर असून व्हेंटिलेटरवर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माध्यमांना सांगितले, ‘डॉक्टर्स आणि विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांमध्ये सकाळी १० वाजता चर्चा झाली. विक्रम गोखले हे गंभीर असून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ही अफवा आहे.’

अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा पहिला अभिनय

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. १९७१ सालापासून त्यांनी या क्षेत्रात करिअर केले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘परवाना’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर त्यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे. भिंगरी, कळत न कळत, माहेरची साडी, दे दणादण, नटसम्राट अशा मराठी चित्रपटातील अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!