40 हजार गाण्यांना आवाज देणारा गायक हरपला

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
चेन्नई : लोकप्रिय पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. 5 ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली.
दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास 40 हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.