‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चा सहावा वर्धापनदिन थाटात

स्पर्धा विजेते, कोविड योद्धे, स्मार्ट लीडर, शिक्षकांचा गौरव

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी: कोकणचे महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा सहावा वर्धापनदिन सोहळा सोमवारी सावंतवाडीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग लाईव्हच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया सिंधुदुर्ग लाईव्हने केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करोना चित्ररथाचा फ्लॅग दाखवून शुभारंभ झाला. त्यानंतर हा चित्ररथ जनजागृतीसाठी जिल्ह्यात रवाना झाला.
वर्धापनदिन सोहळा सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे संपन्न झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, गावडे काका महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, फोमेंतो ग्रुपचे डायरेक्टर जो. लुईस, ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे मुख्यसंपादक सागर चव्हाण, ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे किशोर नाईक गावकर, ‘गोवन वार्ता’चे पांडुरंग गावकर, सदानंद नाईक, सागर लाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा विजेते, कोविड योद्धे, स्मार्ट लीडर, शिक्षकांचा गौरव

दीपप्रज्वलन करून ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ने घेतलेल्या ऑनलाईन पाककला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान, कोविड योद्द्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘स्मार्ट लीडर’ देऊन गौरविण्यात आले. साना होम्सचे महेन ढोलम, अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ. एम. बी. प्रभू, दोडामार्ग येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, उद्योजक विशाल परब, सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडिवरेकर, उद्योजक प्रदीप उर्फ आबा कोटकर, उद्योजक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक दळवी, पुरोहित रामचंद्र उर्फ बाबा कुडके यांसह संजीवनी बहुउद्देशिय संस्थेला स्मार्ट लीडर पुरस्काराने गौरविण्यात आलं. ‘रेसिपी शो’मधील विजेत्या सीमा नाईक, उमा चोडणकर, अलका कुबल, दर्शना मडगावकर, अमृता पाडगावकर आदींना बक्षीस वितरण करण्यात आले. यांच्यासह कोविडयोद्धा व सिंधुदुर्ग लाईव्हच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विनायक गावस यांना डायमंड, भरत केसरकर यांना गोल्ड, तर गुरुप्रसाद दळवी यांना सिल्व्हर अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गावडे काका महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यासह अन्य मान्यवरांनी सिंधुदुर्ग लाईव्हला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश जोशी, जुईली पांगम; तर आभार चिफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी मानले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने चित्ररथ काढण्यात आला.

हेही वाचाः फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीत गोवा तिसऱ्या क्रमांकावर

हेही पहाः Mopa Issue | मोपा विमानतळ आणि हायवेविरोधात तीव्र निदर्शनं आमची जमीन आमकां जायचा नारा

उपक्रमांप्रमाणेच प्रबोधनाचे कार्य करावे : नारायण राणे

या देदिप्यमान सोहळ्याला शुभेच्छा देताना खासदार नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनेलने बातम्या देताना अनेक सामाजिक उपक्रम राबविले. मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मा, ऑपरेशन, सिटी ऑन सायकल, नर्स डे, डॉक्टर डे यासह अनेक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. असे उपक्रम तुम्हीच राबविले तर लोकप्रतिनिधी काय करणार? ही तर लोकप्रतिनिधींची कामं आहेत. मात्र, असं असलं तरी आता यापुढेही न थांबता तुम्ही असंच कार्य सुरू ठेवा, असं सांगताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगभरातील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठीही प्रबोधन करावं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केलं. पत्रकारांचं काम बातम्या पोहचवणं आहे. मात्र, सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनेलने शैक्षणिक क्रांती घडवली. तरुण पिढीला आधुनिकतेची माहिती दिली. कृषिक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम केलं. हे कार्य असंच सुरू ठेवा. आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. लाखो पर्यटक जिल्ह्यात येतात. मात्र, जिल्ह्यात येणारा पर्यटक मालवणात येतो आणि राहायला दुसरीकडे जातो. हॉटेल, जेवण यांचे दर वाढल्याने पर्यटक इथे जास्त काळ टिकत नाही. येणारा पर्यटक हा सहा सात दिवस जिल्ह्यात थांबला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हने समाजप्रबोधन करावं. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. व्यापाऱ्यांनीही एकत्र येऊन जिल्ह्यात एक मोठा मॉल तयार करावा. जिल्ह्यातील निधी मागे जात आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत. सी वर्ल्ड, दोडामार्ग आडाळी एमआयडीसी आणली मात्र एकही उद्योग येऊ शकला नाही. विमानतळ अजून सुरू झाले नाही. या सर्व प्रश्नांवर जिल्ह्यातील पत्रकारांनी आवाज उठवावा, असं आवाहन खासदार नारायण राणे यांनी केलं.

खासदार राऊत यांनी दिल्या शुभेच्छा!

खासदार विनायक राऊत म्हणाले, जिल्ह्यातील समस्यांना सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनेलने वाचा फोडली. चॅनेल असो वा वर्तमानपत्र या सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. ती सामाजिक बांधिलकी सिंधुदुर्ग लाईव्हने जपली. विविध सामाजिक उपक्रम राबविले. यापुढेही बातम्या देताना आपले समाजकार्यही सिंधुदुर्ग लाईव्हने सुरूच ठेवावं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!