सीरम केंद्राला लस देते १५० मध्ये आणि राज्यांना देते ४०० मध्ये!

खासगी रुग्णालयांना तर ६०० रुपयांत लस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : अभिनेता फरहान अख्तर. एक ट्वीट करतो. ट्वीटमधून तो सवाल उपस्थित करतो सीरम इन्स्टिट्यूच्या किंमतींवरुन. सीरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारला १५० रुपयात लस देतेय. राज्यांसाठी याच लसीची किंमत दुप्पट पेक्षा जास्त म्हणजे ४०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर खासगी रुग्णालयांसाठी या लसीची किंमत सीरमनं ठेवली आहे तब्बल ६०० रुपये. ट्वीटरवर अनेकांनी एनडीटीव्हीचा फोटो शेअर केलाय. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही याच फोटोवरुन सवाल उपस्थित केलाय.

काय म्हणतोय तो, वायरल फोटो?

एनडीटीव्हीच्या ब्रेकिंगचा फोटो व्हायरल होतोय. या फोटोत लसीकरणाच्या किंमतीत मोठी तफावत असल्याचा आरोप केला जातोय. सीरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली कोविशील्ड या लसीची किंमत राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोसनं विकली जाते आहे. तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रति डोस अशी विकली जातेय. तर केंद्राला फक्त १५० रुपये प्रति डोस इतकीच किंमत आकारली जाते आहे.

यात एक गोष्ट स्पष्ट आहे, कोविशिल्ड लसीचे दर हे प्रत्येकासाठी सारखे नाहीत. त्यावरुन फरहान अख्तरपासून ते जयराम रमेश यांच्यापर्यंत अनेकांनी सवाल उपस्थित केले. त्यामुळे निश्चितपणे हा दुजाभाव नेमका कशासाठी आहे, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

नवा वाद

१ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली आहे. याआधी लस खरेदीचा अधिकाह हा फक्त केंद्राला होता. त्यामुळे केंद्र सरकारच सगळ्या राज्यांना लसीची खरेदी करुन त्यांचं डिस्ट्रीब्युशन करत होती. मात्र आता १ मेपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु होणार आहेत. त्यासाठी फक्त राज्य सरकारंच नाही, तर खासगी रुग्णालयही कोरोनाच्या लसी खरेदी करतील. मात्र त्यासाठी जी किंमत राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना मोजावी लागणार आहे, त्यावरुन नवा वाद पेटलाय.

याआधी राज्या-राज्यांना झालेलं जे लसींचं वितरण झालं होतं, त्या वितरणावरुन सवाल उपस्थित केले जात होते. मात्र आता तर चिंता ही किंमतीवरुन व्यक्त केली जाते आहे. कारण १ मे पासून १८ वर्षांवरील सगळ्यांना जी लस दिली जाणार, तिच्या किंमतीवर कोण नियंत्रण ठेवणार? कारण लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडणार यात शंका नाहीच. पण त्याचं नियोजन आणि आर्थिक गणित हे येत्या काळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यताय.

सरकारी रुग्णालयात लस मोफत मिळणार हे तर स्पष्ट झालं. पण एकूणच राज्याची लोकसंख्या पाहिली तर या किंमती, यांचं वितरण आणि लसींची वाढती मागणी, या सगळा प्रकार आव्हानात्मक असणार आहेच. शिवाय त्यात प्रामुख्यानं येत्या काळात किंमतीवरुन आणखी राजकारण पेटेल यातही शंका नाहीये.

आता गोष्ट सीरमबद्दल…

३ जानेवारीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आधी ज्येष्ठांना, त्यानंतर ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांचं लसीकरण केलं जातंय. केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आता १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचंच लसीकरण होईल. त्यात कोविशिल्ड लसीच्या किंमती सीरमनं निश्चित केल्यात. या किंमतीवरुनच अनेकांनी सीरमसोबतच केंद्रावरही निशाणा साधलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!